बाबासाहेबांच्या प्रचारप्रमुखांची नातीन नगराध्यक्षपदाच्या रिंगणात
बाबासाहेबांच्या प्रचारप्रमुखांची नातीन नगराध्यक्षपदाच्या रिंगणात
मूल | प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी आणि त्यांच्या भंडारा लोकसभा निवडणुकीतील प्रचारप्रमुख स्व. श्री. बालाजी पाटील बोरकर यांची नातीन प्रा. डॉ. किरण किशोर कापगाते या आता मूल नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून दावेदार म्हणून रिंगणात उतरल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा भंडारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या प्रचाराची जबाबदारी कोहळी समाजातील प्रभावी नेते बालाजी पाटील बोरकर यांनी स्वीकारली होती. भंडारा जिल्ह्यात कोहळी समाजाचा मोठा प्रभाव असल्याने, त्या समाजाचा पाठिंबा बाबासाहेबांना मिळावा यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख सौ. विजया रामटेके लिखित “सामाजिक समरसतेचा दीपस्तंभ – श्री. बालाजी पाटील बोरकर” या पुस्तकाच्या पान क्रमांक 11 व 12 वर करण्यात आला आहे.
आज त्यांची नातीन प्रा. डॉ. किरण कापगाते या देखील सामाजिक कार्य, शिक्षण आणि नेतृत्व यामध्ये सक्रिय आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे नगर परिषद निवडणुकीत ऐतिहासिक वारशाचा आणि नव्या पिढीच्या नेतृत्वाचा संगम दिसून येत आहे. त्यामुळे मूल शहराच्या राजकारणात नव्या उत्सुकतेची आणि चर्चेची लाट उसळली आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!