भाजपचा ‘समर्थ’ आता कॉंग्रेसचा ‘अस्त्र’! – नगराध्यक्ष पदासाठी एकता समर्थ सज्ज

 भाजपचा ‘समर्थ’ आता कॉंग्रेसचा ‘अस्त्र’! – नगराध्यक्ष पदासाठी एकता समर्थ सज्ज

मूल | प्रतिनिधी

मूल नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात मोठी हलचल निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. भाजपाचे माजी नगरसेवक व प्रभावशाली कार्यकर्ते प्रशांत समर्थ हे लवकरच कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत समर्थ हे आपल्या पत्नी सौ. एकता समर्थ यांना नगराध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, आणि कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीस हिरवा कंदील दिल्याची माहिती आहे. प्रशांत समर्थ स्वतः प्रभाग क्र. १ मधून नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरणार असल्याचीही चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून प्रशांत समर्थ हे विविध राजकीय समीकरणांचा तौलनिक अभ्यास करत होते. भाजपाकडे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने, ते पक्षातून नाराज असल्याची आणि दुसऱ्या पक्षाचा विचार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर त्या चर्चांना आता पुष्टी मिळाल्यासारखी स्थिती आहे.

कॉंग्रेसने प्रशांत समर्थ यांना नगराध्यक्ष पदासाठी हिरवा झेंडा दाखविल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असून, लवकरच ‘कमळ’ सोडून ‘पंजा’ उचलताना प्रशांत समर्थ दिसतील, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.

आमचे प्रतिनिधी प्रशांत समर्थ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाबाबतची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तथापि, नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीमुळे मूलच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!