गोसेखुर्द धरण सुरक्षा रक्षकांची दिवाळी अंधारात!
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - राष्ट्रीय प्रकल्प म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदिरा सागर गोसेखुर्द धरणाच्या सुरक्षेसाठी नेमलेले सुरक्षा रक्षक दिवसरात्र आपली जबाबदारी पार पाडत असतानाच त्यांच्या कुटुंबांवर मात्र दिवाळीचा काळोख पसरला आहे.
गोसेखुर्द धरण विभागाने रक्षकांची वर्षभर नियमित वेतन देऊन जबाबदारी निभावली; मात्र दिवाळी सारख्या आनंदाच्या मोठ्या सणाला पगाराचा हक्काचा पैसा त्यांच्या हाती पडला नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षक व त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक कुचंबणा झाली असून घराघरांत सणाऐवजी निराशेचे सावट पसरले आहे.
धरण सुरक्षित ठेवणारे हे रक्षकच स्वतःच्या घरात दिवाळीचा दिवा लावण्यास असमर्थ ठरले, ही बाब प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करते आहे. यामुळे शासन व संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून रक्षकांचा थकलेला पगार देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
“धरणाला प्रकाश, पण रक्षकांच्या घरी अंधार” अशी करुण वस्तुस्थिती यंदाच्या दिवाळीत दिसून येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!