“राजोली–मारोडात राजकारण पेटणार; ‘वार’ कोणाचा चालणार?”

“राजोली–मारोडात राजकारण पेटणार; ‘वार’ कोणाचा चालणार?”

मूल तालुक्यातील राजोली–मारोडा जिल्हा परिषद मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण अखेर जाहीर झाल्याने, गावागावांत राजकीय तापमान चढले आहे. "कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार?", "कुणाला तिकीट मिळणार?" आणि "कोणत्या जातीचे कोणत्या गटाचे पारडे जड?" — अशा प्रश्नांवर आता चहाच्या टपऱ्यांपासून ते चावडीवर चर्चेची रणधुमाळी सुरू आहे.

दिवाळीच्या फटाक्यांच्या आवाजात या चर्चा क्षणभर शांत झाल्या असल्या तरी, दिवाळीनंतरचा स्फोट मात्र राजकीय असेल, हे नक्की!

या वेळी राजोली–मारोडा मतदारसंघ नागरीकांचा मागासवर्गीय (ओबीसी) राखीव झाल्याने, या गटातील अनेक दिग्गज नेत्यांची नजर या क्षेत्रावर खिळली आहे.

भाजपात ‘नर्मलवार विरुद्ध मुद्दमवार’ सामना तीव्र

भारतीय जनता पक्षाकडून उश्राळाचे सरपंच बंडू नर्मलवार हे आघाडीचे दावेदार म्हणून पुढे येत आहेत. गेली अनेक वर्षे ते स्थानिक राजकारणात सक्रिय असून, भाजपाच्या सर्व गटांशी सलोख्याचे संबंध व व्यापक जनसंपर्क यामुळे त्यांचा दावा मजबूत मानला जातो.

याचवेळी तरुण वकिल सागर मुद्दमवार यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ते पक्षात नवे असले तरी, त्यांचे वडील चंद्रकांत मुद्दमवार हे मागील ३५ वर्षांपासून भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पक्षाच्या संघटनातील त्यांना नैसर्गिक पाठबळ मिळू शकते.

शिवाय, सागर हे मोठ्या गावाचे मारोडाचे रहिवासी असल्याने स्थानिक मतदारसंघात त्यांना भौगोलिक लाभ मिळू शकतो.

यामुळेच भाजपात ‘नर्मलवार की मुद्दमवार?’ असा आतला सामना रंगण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

दरम्यान, राजोलीचे माजी पंचायत समिती उपसभापती गजानन वल्केवार यांनीही भाजपाकडून दावा करणार आहे. राजोली हे मोठे आणि प्रभावी गाव असल्याने, त्या भागात भाजपाची पकड मजबूत आहे. त्यामुळे वल्केवार यांचा दावा देखील दुर्लक्षित करता येत नाही.

“भाजपात तीन मजबूत दावेदार आहेत, निर्णय कुणाच्या बाजूने झुकतो हे पाहणे रंजक ठरेल.”

कॉंग्रेसकडून ‘कारमवार’ची जोरदार तयारी

दुसरीकडे, कॉंग्रेसकडून आकापूरचे संदीप कारमवार यांचे नाव आघाडीवर आहे. ते मागील अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात कार्यरत असून, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व अनेक सहकारी संस्थांचे अध्यक्ष आहेत.

शेतकरी वर्गाशी असलेले निकटचे संबंध आणि संघटनातील पकड यामुळे ते भाजपाला टक्कर देणारे सक्षम उमेदवार ठरू शकतात, अशी चर्चा कॉंग्रेस गोटात सुरू आहे.

“जनतेला आता पर्याय हवा आहे, आणि कारमवार ते देऊ शकतात.” – काँग्रेस पदाधिकारी बोलत आहेत.

मारोडाचे पंकज पुल्लावार, डोंगरगावचे किरण पोरेड्डीवार हे दोन "वार"  देखील दावेदारी करू शकतात अशी चर्चा आहे.

महायुतीत मतभेद? राष्ट्रवादी स्वबळावर!

या मतदारसंघात भाजप उमेदवार देणार असल्याची चर्चा असली तरी, महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार गट) यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.

त्यांचा उमेदवार अद्याप जाहीर न झाल्याने नाव गुलदस्त्यात आहे.

‘फिस्कुटी प्रेम’ भाजपासाठी नाराजीचा विषय?

या मतदारसंघातून मागील निवडणुकीत भाजपाच्या जेष्ठ नेत्या श्रीमती संध्या गुरूनुले यांनी विजय मिळविला होता. त्यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदही लाभले होते.

मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी आपले लक्ष मतदार संघ बाहेरील स्वगाव फिस्कुटीच्या 'विकासा'(?) वरच केंद्रित करीत स्थानिक मतदारसंघाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे.याचा फटका या भागातील भाजपाकडील मोठ्या ग्राम पंचायती कॉंग्रेसकडे जाण्यात बसला. असे असले तरी, मतदार मात्र 'भाजपा'वर नाराज नसून

सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळातील विकासकामे आणि मतदारांचा त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास प्रेम, जनसंपर्क या  घटकांमुळे भाजप पुन्हा एकदा या क्षेत्रात आपली पकड कायम ठेवू शकते.
 “भाजपाकडे संघटन, विकास आणि मुनगंटीवारांचा चेहरा — या तिन्ही गोष्टींचे बळ आहे.” 
 

दिवाळीनंतर फुटतील ‘राजकीय फटाके’

एकंदरीत, राजोली–मारोडा जि.प. क्षेत्रात यंदा ‘वार विरुद्ध वार’ असा सत्तासंग्राम रंगणार आहे.

दिवाळीच्या फटाक्यांचा आवाज ओसरल्यानंतर, राजकीय रणसंग्रामाचे आवाज दणाणतील, हे आता नक्की झाले आहे!

ॲड सागर यांनी तयारी सुरू केल्याने अनेकांचे भुवया उंचावले आहेत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!