वनमजुरांची दिवाळी अंधारात - सात महिन्यापासून मजूर मजुरीच्या प्रतीक्षेत
सावली : सावली वनपरीक्षेत्रात काम करणाऱ्या शेकडो वनमजुरांचे वेतन दिवाळीत मिळेल ही आशा असतांना मात्र ७ महिन्यापासून वेतन न मिळाल्याने मजुरांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. वेतन न झाल्याने दिवाळीच्या सणात मजुरांच्या मुलांची दिवाळी कशी साजरी झाली असेल ते अधिकाऱ्यांच्या कसे लक्षात येत नाही असा संतप्त सवाल मजु्रांकडून केल्या जात आहे.
वनविभागात शासकीय कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. पण जंगली प्राण्यांचे माणसांवर व पाळीव जनावरांवर होणारे हल्ले, पिकांची नासधूस, वनीकरण या कामी वनमजुरांची फार मदत होते. प्राथमिक कृती दल, बिट मदतनीस, संगणक परिचालक अशा पदावर रोजंदारी कामगार म्हणून मागील अनेक वर्षापासून शेकडो स्थानिक मजूर काम करीत आहेत. काम करीत असतांना आज उद्या वेतन मिळेल अशा आशेवर मजूर रात्रंदिवस काम करीत असतात. मजुरांचे मागील एप्रिल महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. मात्र दिवाळी हा सण असल्याने अधिकारी कर्मचारी यांना वेतनासोबत बोनसही दिल्या जाते त्यावेळी तरी आपले वेतन मिळेल या आशेवर मजूर होते. पर्यटनाच्या नावाखाली गावे खाली करून गावकऱ्यांना काम देण्याचे आमिष देत मजूर म्हणून कामास लावल्या जाते पण वेतनही दिल्या जात नसेल तर त्या पर्यटनाचे महत्व काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. दिवाळीत घरी प्रकाश पडेल असे वाटत असतांनाही अजूनपर्यंत वेतन न मिळाल्याने मुलांची दिवाळी हात उसने करून साजरी करण्याची वेळ मजुरांवर आली असल्याने शासनाच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केल्या जात आहे.
एप्रिल महिन्यापासून वनमजुरांची मजुरी शासनाकडून अद्याप प्राप्त न झाल्याने मजुरांचे मानधन थकले आहे. थकीत मजुरी व मानधन संदर्भाने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा व वारंवार निधीची मागणी करीत सातत्याने मजुरी संदर्भाने स्वतः आपल्या स्तरावरून पूर्णपणे प्रयत्न करीत आहे.
विनोद धुर्वे,
वनपरिक्षेत्र अधिकारी सावली



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!