“भावी नगरसेवकांच्या कपाळावर आठ्या! कारण ऐकून थक्क व्हाल…”

 “भावी नगरसेवकांच्या कपाळावर आठ्या! कारण ऐकून थक्क व्हाल…”


मूल | प्रतिनिधी

नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशींग बांधून प्रचाराच्या तयारीत आहेत. मात्र या राजकीय शर्यतीत काहींच्या कपाळावर अचानक आठ्या उमटल्यात. कारण असं की — शहरात त्यांच्या ‘मालमत्ते’विषयी विरोधकांचे लक्ष केंद्रीत झाल्याची चर्चा रंगली आहे.

काही संभाव्य उमेदवारांच्या नावांशी संबंधित मालमत्तेचे दस्तऐवज आणि जमिनींची नोंद अतिक्रमणाची असल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारांचे सरकारी जागेवर अतिक्रमण असल्यांस त्यांची उमेदवारी रद्द होवू शकते. तशी तरतूद नियमात आहे.

शहरातील नागरिकांमध्येही आता चर्चा सुरू झाली आहे की, “उमेदवार शहराचा कारभार सांभाळणार, पण त्याचीच मालमत्ता नियमांच्या चौकटीबाहेर असेल तर?”

याआधीही अशाच प्रकारचे प्रकरण गाजले होते. मागील नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या एका उमेदवारावर क्रिडा संकुलाच्या शासकीय जागेचा वापर करून बांधकाम केल्याची तक्रार काँग्रेसकडून करण्यात आली होती. हे प्रकरण चांगलेच गाजले; मात्र वादग्रस्त भिंत पाडून टाकत त्या उमेदवाराने आपली उमेदवारी शाबूत ठेवली, हे विशेष.

नियमांनुसार, जर कोणत्याही उमेदवाराने शासकीय किंवा सार्वजनिक जागेवर बेकायदेशीर बांधकाम केलेले असल्याचे सिद्ध झाले, तर त्याची उमेदवारी तात्काळ रद्द होऊ शकते. एवढेच नव्हे, तर तो उमेदवार निवडून आल्यानंतरदेखील, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल झाल्यास त्याचे पद रद्द करण्याचा अधिकार शासनाने दिला आहे.

दरम्यान, काही उमेदवारांनी आपल्या कागदपत्रांची झाडाझडती सुरू केली असून, काहींनी गुपचूप बांधकामे ‘सुधारण्या’चा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे निवडणूक फक्त पक्षांतील लढत न राहता, स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांतील खरी कसोटी ठरणार आहे — असे नागरिकांत बोलले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!