भरत गुप्ता व त्यांच्या सहकाऱ्यांकडून युवासेना जिल्हा प्रमुखावर जीवघेणा हल्ला

चंद्रपूर शहरातील प्रकार

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : -  पक्षातील अंतर्गत वाद मिटविण्यासाठी आलेल्या युवासेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख आलेख रमेश रट्टे यांना काही कार्यकर्त्यांकडून जीवघेणी धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात आलेख रट्टे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात ऑनलाईन तक्रार दाखल केली असून त्यांच्या जीवाला धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तक्रारीनुसार, 13 ऑक्टोबर रोजी आलेख रट्टे हे चंद्रपूरातील शिवसेना जिल्हाप्रमुख युवराज धानोरकर आणि भरत गुप्ता यांच्यातील वाद मिटविण्यासाठी आले होते. संवादासाठी भरत गुप्ता यांच्याशी भेट ठरवल्यानंतर ते त्यांच्या निवासस्थानी गेले असता, भरत गुप्ता यांनी आक्रमक भाषेत बोलत धमकी दिली. इथून जिवंत परत जाणार नाहीस असे वक्तव्य करून त्यांनी काही महिलांना फोन केल्याचे रट्टे यांनी तक्रारीत म्हटले आहे. यानंतर परिस्थिती गंभीर होऊ नये म्हणून आलेख रट्टे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तेथून निघण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी निघाल्यानंतर काही वेळातच चांडक मेडिकल व रसराज हॉटेलजवळ भरत गुप्ता, श्रेयस ठाकूर, पियुष ठाकूर यांच्यासह ६ इसम दोन ते तीन दुचाक्यांवर येऊन त्यांच्या गाडीवर दंडक व हाताने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. आज तुला जिवंत सोडणार नाही, चंद्रपूर बाहेर जाऊ देणार नाही, अशा स्वरूपाच्या धमक्या देत त्यांनी गाडीचा पाठलाग केल्याचे रट्टे यांनी नमूद केले आहे.  
रात्रभर भरत गुप्ता व त्यांच्या साथीदारांकडून वारंवार फोनद्वारे धमक्या येत राहिल्याचा आरोपही रट्टे यांनी तक्रारीत केला आहे. आम्ही कोण आहोत ते समजलं का तुला, आता तुला जगू देणार नाही, अशा धमक्यांमुळे ते भयभीत झाले आहेत. आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी योग्य ती पोलिस कार्यवाही करावी, अशी मागणी हि आलेख रट्टे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!