नगराध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्यांची झुंज?; मूलच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला जाणार काय?
नगराध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्यांची झुंज?; मूलच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला जाणार काय?
मूल (प्रतिनिधी) :
मूल नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर होताच, शहराच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. यंदा नगराध्यक्षपद ‘मागास प्रवर्गातील महिला’साठी आरक्षित झाल्याने, या पदावर कोणाची लॉटरी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरात पारंपारिकरित्या कॉंग्रेस विरुद्ध भाजप असा सामना होत असतो. यंदाही हेच चित्र दिसण्याची चिन्हे आहेत.
भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांत आतापासूनच उमेदवारीसाठी पाठीमागून हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपात उमेदवारांची अक्षरशः गर्दी दिसत आहे. पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राकेश ठाकरे यांनी आपल्या आई व माजी नगरसेविका रत्नमाला ठाकरे यांना उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्यास, आपल्या पत्नीला रिंगणात उतरवण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. माजी नप सभापती महेंद्र करकाडे यांची पत्नी माधुरी करकाडे, भाजपाचे शहर अध्यक्ष मनिषा गांडलेवार नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक चर्चा आहे.
माजी नगराध्यक्ष उषा शेंडे या पुन्हा पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. माजी नगरसेवक प्रशांत समर्थ यांच्या पत्नी एकता समर्थ, माजी नगरसेविका विद्या बोबाटे, शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांच्या पत्नी चेतना मोहुर्ले यांचे चर्चेत आहेत. पत्रकार कुमुदिनी भोयर यांचीही नाव चर्चेत आहेत.
दरम्यान, भाजपाकडून प्रा. किरण कापगाते यांचे नाव सध्या जोरात चर्चेत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर वाढलेल्या आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रा. कापगाते या गेल्या काही वर्षांपासून भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या शिक्षण, संघटन कौशल्य व स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. तथापि, ओबीसीमधील ‘अल्पसंख्याक’ घटकातील असल्याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, कॉंग्रेसमध्ये मात्र इच्छुकांची फारशी गर्दी दिसून येत नाही. मात्र, शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा नलीनी आडपवार या नावाने चर्चेला जोर धरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, दोनशेहून अधिक बचत गटांची निर्मिती करून त्यांनी दोन हजारांहून अधिक घरांपर्यंत थेट पोहोच साधली आहे. ग्रासरूटवर त्यांचा मजबूत प्रभाव असल्याने, त्या कॉंग्रेसकडून प्रभावी उमेदवार ठरू शकतात.
नलीनी आडपवार या महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष असून, त्या ओबीसी समाजातील प्रभावी चेहरा आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदावर त्यांचा ‘नैसर्गिक हक्क’ असल्याची चर्चा पक्षात सुरू आहे. “संधी मिळाल्यास, आम्ही ती संधीचे सोने करू,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि आम आदमी पार्टीदेखील या निवडणुकीत आपली एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदाची नगरपरिषद निवडणूक चुरशीची होणार हे नक्की झाले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!