चारगाव नदीवर पर्यायी रपटा न झाल्यास जलसमाधी आंदोलन करणार - विजय कोरेवार यांचा इशारा

 
सावली - सावली ते चारगाव मार्गावरील नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरु असल्याने जुने पूल तोडण्यात आले व बाजूला पर्यायी रपटा बनविण्यात आला मात्र नदीत पाणी वाढल्यामुळे हा रपटा वाहून गेला त्यामुळे मार्ग बंद करण्यात आला आहे. नदीचा प्रवाह कमी झाला असल्याने त्वरित रपटा करा अन्यथा नदीत जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा माजी सभापती विजय कोरेवार व श्रीकांत बहिरवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

        चारगाव नदीवर मागील वर्षीपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली पूलाचे बांधकाम सुरु आहे. उन्हाळ्यात नवीन पुलाचे बांधकाम करतांना जुने पूल क्षतिग्रस्त करण्यात आले. तात्पुरता बाजूला रपटा बनविण्यात आला व तेथून रहदारी सुरु होती. मात्र पावसाळ्यात नदीत पाण्याचा प्रवाह जास्त आल्याने रपटा वाहून गेला व प्रशासनाने हा मार्ग बंद केला आहे. त्यामुळे पाऊस ओसरला असतानाही अजूनही या मार्गाने चारगाव, भारपायली, मानकापूर, चक मानकापूर, मेटेगाव, सादागड, सादागड हेटी या गावातून प्रवास करणाऱ्यांनी चिमढा, टेकाडी व पांढरसराड या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. मार्च २०२४ पासून पुलाचे बांधकामाला एस. डी. मुलानी कन्स्ट्रॅक्शन कपंनीने सुरवात केली. मागील पावसाळ्यात जुने पूल कायम असल्याने वाहतुकीस अडचण गेली नाही मात्र उन्हाळ्यात जुने पूल तोडण्यात आले परंतु बांधकाम संतगतीने सुरु असल्याने काम अपूर्ण राहिले. त्यामुळे त्या भागातील जनतेला वाहतुकीचा फटका बसत आहे. पावसाळा ओसरला असल्याने व पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने रपट्याचे काम कंत्राटदारकडून करून वाहतूक सुरु करावी अन्यथा २० ऑक्टोबरपासून परिसरातील नागरिकांना घेऊन नदीत जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार व श्रीकांत बहिरवार यांनी निवेदनातून सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!