मूल तालुक्यात फक्त 172 शेतकरी लाभार्थी; हजारो शेतकरी प्रतीक्षेत

पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांवर अन्याय?
मूल तालुक्यात फक्त 172 शेतकरी लाभार्थी; हजारो शेतकरी प्रतीक्षेत
मुल (प्रतिनिधी)
खरीप हंगाम 2023-24 मधील अवकाळी पावसाने मोठे नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांना पिक विम्याचा आधार मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र नुकतीच जाहीर झालेल्या यादीत मूल तालुक्यातील फक्त 172 शेतकऱ्यांनाच पिक विम्याचा लाभ मिळाल्याने उर्वरित पात्र शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने धान, कापूस, सोयाबीनसह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नियमाप्रमाणे पिक विमा कंपनीकडे तक्रारी दाखल केल्या व कंपनीने पंचनामे सुद्धा केले. निधी मिळताच शेतकऱ्यांना मदत मिळणार, अशी आश्वासनेही दिली गेली.

परंतु प्रत्यक्षात आलेल्या यादीत फक्त 172 शेतकऱ्यांना मिळून रु. 33,35,312 इतकेच विमा वितरण झाले असून हजारो शेतकरी अजूनही निराशेच्या दरीत आहेत. निधी टप्प्याटप्प्याने वितरित होत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत असले तरी शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहेत.

दरम्यान, आपल्या हक्काच्या विम्यासाठी शेतकरी अजून किती दिवस प्रतीक्षा करणार, असा सवाल आता ग्रामपातळीपासून सोशल मीडियापर्यंत जोरदारपणे उपस्थित केला जात आहे. शासनाने तत्काळ हस्तक्षेप करून उर्वरित पात्र शेतकऱ्यांना गारंटीने विमा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
---
“तालुक्यातील फक्त 172 शेतकऱ्यांना रुपये 33,35,312 पिक विमा मिळाला आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून पुढील निधी प्राप्त होताच पिक विमा कंपनीमार्फत लाभ दिला जाईल.”
सुनील कारडवार,
तालुका कृषी अधिकारी, मूल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!