बच्चू कडूंचा सरकारवर पुन्हा हल्लाबोल; म्हणाले, 'आम्ही नेपाळसारखे घरात घुसू, आम्हाला पेटवणं...'

सावली - बच्चू कडू यांनी सावली तालुक्यातील पाथरी गावात जनसभा घेत सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, सरकार आम्हाला सातत्यानं लुटत आहे. पण वेळ पडली, तर आम्ही नेपाळसारखे घरात घुसू, आम्हाला पेटवणं जमणार नाही, पण घरात बांधून ठेवू असं कडू यांनी म्हणत सरकारवर हल्लाबोल केला आहे.

       राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांबाबत असलेल्या सरकारच्या धोरणांवर बच्चू कडू यांनी यावेळी सडकून टीका केली. त्यांनी सावली तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या पाथरी गावात जनसभा घेऊन नागपूरच्या 28 तारखेच्या आंदोलनाची भूमिका शेतकऱ्यांसमोर स्पष्ट केली. सरकार आम्हाला सातत्याने लुटत आहे. आम्ही पेटणार नाही, पण वेळ पडली तर घरात बांधून ठेवू, अशा शब्दांत त्यांनी आपला रोष व्यक्त केला.

        बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी आपण आंदोलन करत असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने धानासाठी ७५ रुपयाची लाजिरवाणी भाववाढ केली असल्याचे लक्ष वेधत राज्य शासन धानासाठी क्विंटलमागे ७२८६ रुपये हमीभावाची शिफारस केली असतांना केंद्र शासन २३७५ रुपये हमीभाव जाहीर केला असून उत्पादन खर्चाच्या अर्धीही किंमत देत नाही. शेतकऱ्यांना लुटलेल्या पैशातून लाडकी बहीण, पीएम किसान या योजना राबवून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. दिव्यांगासाठी लढून २५०० रुपये अनुदान मंजूर करायला लावले पण ६ हजार अनुदान होईपर्यंत लढत राहणार. देशातील २०० उद्योगपत्यांचे तुम्ही २० लाख कोटी कर्ज माफ केले आहे. शेतकऱ्यांचे ३० ते ४० हजार कोटी कर्ज माफ करायला काय होते? असा सवाल करीत कर्जमाफीची जोरदार मागणी केली. आयोजन प्रहार जनशक्ती पक्षाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल तुम्मे यांनी केले. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर, पाथरीच्या सरपंच अनिता ठीकरे उपस्थित होते. कार्यक्रमाला शेकडो शेतकरी, दिव्यांग, मजूर यांनी हजेरी लावली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!