पवनी शहरात घटस्थापना निमित्त पारंपरिक आखाडे व शोभायात्रा भव्य उत्साहात
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवनी नगरीत नवरात्र घटस्थापनेच्या औचित्याने सोमवारी पारंपरिक आखाडे व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. माता दुर्गा मंदिरातून निघालेली ही शोभायात्रा वाजत-गाजत माता चंडिका मंदिरापर्यंत पोहोचली. पवनी नगरीतील विविध चौकांतून आखाडे सादर करत झाक्या नाचत पुढे सरकत होत्या. अखाड्यातील तरुणांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. ढोल-ताशांच्या गजरात आकर्षक व पारंपरिक पद्धतीचे आखाडे सादर करण्यात आले.यावेळी नगरामध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. शोभायात्रेच्या मार्गावर गावकरी तसेच स्वयंसेवकांकडून पाण्याची व अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. त्यामुळे उपस्थित भक्तांना सोयीसुविधांचा लाभ मिळाला.या पारंपरिक सोहळ्याने पवनी नगरीत नवरात्र महोत्सवाची सुरुवात झाली असून पुढील नऊ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही देवी व सांस्कृतिक उत्सवात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अनुभवायला मिळाला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!