ॲड. बाबासाहेब वासाडे — एक आठवण

ॲड. बाबासाहेब वासाडे — एक आठवण


चंद्रपूर जिल्ह्याच्या जुन्या पिढीतील द्रष्टे नेते, शिक्षण महर्षी आणि सहकार महर्षी ॲड. बाबासाहेब वासाडे हे काही दिवसांपूर्वी अनंतात विलीन झाले. त्यांची ओळख फक्त शिक्षणप्रेमी समाजकारणी म्हणून नव्हे, तर हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून कायम स्मरणात राहील.

मी स्वतः कर्मवीर महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि नंतर नवभारत कन्या विद्यालयाचा शिक्षक म्हणून त्यांच्याशी जोडला गेलो. म्हणूनच माझे त्यांच्याशी असलेले संबंध नेहमीच वेगळ्या स्वरूपाचे राहिले.

खरं म्हणजे, मी त्यांच्या संस्थेत नोकरीला कसा लागलो? हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. कारण विद्यार्थी जीवनात मी अनेकदा आंदोलनांचे नेतृत्व केले होते. कर्मवीर महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी केलेल्या आंदोलनामुळे महाविद्यालयीन व्यवस्थापनास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. इतकेच काय, माझ्या आंदोलनामुळे विदर्भ साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला तब्बल दोन तास विलंब झाला होता. तेव्हाचे पालकमंत्री रणजीत देशमुख आणि पोलिस अधीक्षक हेमंत करकरे यांच्या मध्यस्थीनेच तो कार्यक्रम पुढे सरकला होता. त्यामुळे व्यवस्थापन आणि प्राध्यापक वर्गात माझ्याविषयी एक नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली होती.

पण तरीही ॲड. बाबासाहेब वासाडे यांनी इतरांचा विरोध डावलून मला त्यांच्या संस्थेत शिक्षक म्हणून संधी दिली. हाच त्यांचा मोठेपणा आणि मनाची उदारता दाखवतो.

मी नोकरीत रुजू झाल्यावरही श्रमिक एल्गारचे महासचिव म्हणून कार्यरत होतो. काही दिवसांनीच कोलाम आदिवासींच्या प्रश्नावरून जिवती येथे आंदोलन झाले. हायकोर्टाच्या आदेशाने त्यांना जमिनीचे ताबे मिळाले होते आणि त्यासाठी दोन कोटींच्या आसपास मदतही मिळणार होती. पण आदिवासी विकास विभागाने मदतीच्या वाटपाबरोबरच, आधीच विवाह झालेल्या आदिवासी कुटुंबांची पुन्हा सामूहिक लग्न सोहळ्यात नोंद केली होती. आम्ही आक्रमक होऊन हा प्रकार उधळून लावला. त्या प्रसंगी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत, राष्ट्रवादीचे नेते आणि माझे नियोक्ता ॲड. वासाडे यांच्यासमोरच प्रखर नारेबाजी झाली.

त्या वेळी माझे अप्रुव्हल झालेले नसल्यामुळे माझी नोकरी धोक्यात येऊ शकली असती. पण बाबासाहेबांनी एकदाही नाराजी व्यक्त केली नाही, उलट काहीही न बोलता माझा स्वभाव समजून घेतला. नंतर राजोलीत झालेल्या शाळेच्या स्नेहसंमेलनात त्यांनी या घटनेची आठवण करून देत हसतच मला स्टेजवरून टोचले—
"अरे तो सिद्धावार पत्रकार कुठाय? फक्त जिवतीत नारे देतो काय? थोडं शाळेतही काम करा हो!"
आणि पुढे मला कार्यक्रमाचे संचालन करण्याची जबाबदारी दिली. शेवटी खांद्यावर हात ठेवून “चांगले काम करतोस” म्हणत प्रोत्साहनही दिले.

नंतर मूल शहरातील मालधक्का आंदोलन हे एक मोठे पर्व ठरले. या आंदोलनामुळे कर्मवीर ग्राउंड आणि शहराचे अस्तित्व धोक्यात आले होते. आम्ही काही जणांनी बाबासाहेबांना भेटून धोके सांगितले. त्यांनी केवळ आंदोलनाची परवानगीच दिली नाही, तर संपूर्ण शिक्षण प्रसारक मंडळाचा पाठिंबा दिला. हजारो विद्यार्थी आंदोलनात उतरले आणि विशेष म्हणजे स्वतः बाबासाहेब गांधी चौकातून मोर्चाचे नेतृत्व करत चालत गेले. ही घटना मूलच्या इतिहासात कोरली गेली आहे.

पण या आंदोलनानंतर काही विघ्नसंतोषी मंडळीनी माझ्यावर पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी करून कारवाईसाठी दबाव आणला. शाळेत चौकशाही झाली. शेवटी ही मंडळी बाबासाहेबांकडेच पोहोचली आणि किमान माझी बदली तरी करावी असा दबाव टाकला. पण बाबासाहेबांनी त्यांचा दबाव नाकारला. उलट त्यांनी स्वतः काही व्यापाऱ्यांना घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना भेटून माझ्या समर्थनार्थ लेखी निवेदन दिले—“विजय सिद्धावार यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये.”

ही बाब माझ्यासाठी आजही गर्वाची आणि अभिमानाची आहे. कारण बाबासाहेब कधीच राजकीय दबावाखाली वागत नसत. उलट आपल्या सहकाऱ्यांच्या, कर्मचार्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत.

आज मागे वळून पाहतो तेव्हा जाणवतं—
जर बाबासाहेबांनी माझ्या आंदोलनांकडे केवळ नकारात्मक नजरेने पाहिलं असतं, तर कदाचित मी एवढं काही करू शकलो नसतो. पण त्यांनी माझ्या कार्यकर्तेपणामागची तळमळ ओळखली आणि मला पाठीशी घातलं.

ॲड. बाबासाहेब वासाडे यांना माझ्याकडून हीच भावपूर्ण श्रद्धांजली—
“आपल्या कार्यकर्त्याला जपणारे, त्याला उभं करणारे, खऱ्या अर्थाने ‘शिक्षण महर्षी’ आणि ‘सहकार महर्षी’ बाबासाहेब आमच्या हृदयात कायम जिवंत राहतील.”

-विजय सिद्धावार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!