सक्सेना प्राथमिक शाळेत जन्माष्टमी व गोपाळकाला उत्सव उत्साहात साजरा
कृष्णभक्तीच्या रंगात न्हावला परिसर
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दिनांक.१६/०८/२०२५ पवनी येथील न.प. सक्सेना प्राथमिक शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्सव मोठ्या उत्साहात तसेच पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती आणि परंपरांविषयी विद्यार्थ्यांमध्ये आदरभाव निर्माण व्हावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळपासूनच शाळेच्या परिसरात भक्तिरसाचे वातावरण पसरले होते. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कृष्ण-राधा आणि गोपिकांच्या वेशभूषा परिधान करून उपस्थिती लावली. पिवळ्या धोती-कुर्ता, बासरी, मोरपिसाचा मुकुट अशा सजलेल्या वेशातील चिमुकले कृष्ण तर रंगीबेरंगी लेहंगे व पारंपरिक दागिन्यांनी नटलेल्या राधा-गोपिका पाहून उपस्थित मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाची सुरुवात सहाय्यक शिक्षिका ज्योती हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय भजन-अभंग सादरीकरणाने झाली. त्यानंतर उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेली दहीहंडी फोडण्याची स्पर्धा पार पडली. विद्यार्थ्यांनी मानवी मनोरा रचत दहीहंडी फोडली आणि संपूर्ण परिसरात आनंदाच्या गजरांनी उत्साह उसळला.
यानंतर गोपाळकाल्याचा प्रसाद – दही, पोहे व पारंपरिक खाद्यपदार्थ सर्वांनी मनसोक्त ग्रहण केला. हा कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना भारतीय सांस्कृतिक मूल्यांशी जोडणारा ठरला.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक अनिल चेटुले, शिक्षिका मोना रायपूरकर, तेश्वर्या बिसणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!