रोहयोच्या सिंचन विहीरीची रक्कम एक वर्षांपासून थकीत - कर्जावरील व्याज वाढत चालल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत
सावली - (विजय कोरेवार )
मागेल त्याला सिंचन विहीर ही वयक्तिक योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने योजना राबविली जाते. सदर योजनेंतर्गत सिंचन विहिरीचे बांधकाम करणाऱ्या शेतकऱ्यांना मागील एक वर्षांपासून बांधकाम साहित्य रक्कम न मिळाल्याने व काहींचे मस्टर न काढल्याने मजुरीची रक्कमही न मिळाल्याने लाभार्थी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कर्ज काढून विहिरीचे बांधकाम करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम देता देता नाकी नऊ येत असल्याने सरकारविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होत आहे व याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील ही अपेक्षा लाभार्थी व्यक्त करीत आहेत.
शेतीला सिंचनाची सोय व्हावी, गावातील मजुरांना गावातच काम मिळावा या उद्देशाने शेतकऱ्यांसाठी चार लक्ष रुपये किंमतीची सिंचन विहीर बांधकामाची योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरु आहे. या योजनेतर्गत पांदन रस्ते, तलाव, बोडी, अशी सार्वजनिक तर सिंचन विहीर, गुरांचा गोठा, सौचालय, शोषखड्डे हे वैयक्तिक लाभाची कामे करण्यात येतात व सावली पंचायत समिती कामे करण्यास जिल्ह्यात अग्रेसर असते. मागील वर्षी सन २०२४-२५ मध्ये सावली तालुक्यात १३९ विहिरीचे बांधकाम जानेवारी ते जून या कालावधीत झाले. या योजनेंतर्गत अकुशलचे अनुदान मजुरांच्या खात्यात तर कुशलची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते. एकूण चार लाख अनुदानापैकी मजुरी १ लाख ४७ हजार तर उर्वरित रक्कम साहित्यासाठी दिल्या जाते. सिंचन विहिरीचे अनुदान सरळ बँक खात्यात शासनाकडून जमा केल्या जाते. काही लाभार्थ्यांच्या विहीर बांधकामाची हजेरी पुस्तकात नोंद न केल्याने मजुरीपासूनही वंचित आहेत. विहिरीचे बांधकाम झाल्यानंतर कुशल मजुरीची रक्कम १३९ लाभार्थ्यांपैकी फक्त ५९ लाभार्थ्यांना मिळाली तर अजूनही एक वर्षांपासून ८० लाभार्थ्यांना रक्कम मिळाली नाही. शेतकऱ्यांनी आपल्याकडील रक्कम खर्च करून, साहित्य उधारीवर घेऊन तर काहींनी कर्ज काढून विहिरीचे बांधकाम केले मात्र ही अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. पावसाळी अधिवेशन सुरु असून शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरीच्या बांधकाम रक्कमेचा विषय लावून धरावा अशी अपेक्षा लोकप्रतिनिधिकडून शेतकरी करीत आहेत.
मार्च २०२४ पूर्वी माझ्या विहिरीचे बांधकाम झाले. मजुरांना नगदी रक्कम देऊन व दुकानदाराकडून साहित्य उधारीवर घेऊन बांधकाम केले. फक्त मजुरीची रक्कम मिळाली पण उर्वरित साहित्याची रक्कम अजूनपर्यंत मिळालेली नाही. शेतीचा हंगाम असून शेती कशी करावी हा प्रश्न सतावत आहे.
गुरुदेव भुरसे केरोडा
सिंचन विहीर लाभार्थी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!