शारीरिक शिक्षण शिक्षकांची संयुक्त सभा मुल येथे उत्साही वातावरणात संपन्न

शारीरिक शिक्षण शिक्षकांची संयुक्त सभा मुल येथे उत्साही वातावरणात संपन्न


मुल | दिनांक २२ जुलै २०२५ — जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मुल येथील तालुका क्रीडा संकुलात मुल व सावली तालुक्यांतील शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षकांची संयुक्त सभा उत्साहात पार पडली. शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे नियोजन, आयोजन आणि अंमलबजावणी यासंदर्भातील ही बैठक अत्यंत फलदायी ठरली.

सभेची सुरुवात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश जिड्डीवार, मुख्याध्यापक चंद्रशेखर पिदुरकर, रामभाऊ डाहुले, विजय खोब्रागडे, ज्येष्ठ शिक्षक गुरूदास चौधरी, श्रावण बोरकर, लिलाधर सुत्रपवार, संयोजक विनोद बोरकर आणि नामदेव पिजदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन, प्राथमिक नोंदणी प्रक्रिया, खेळाडूंची निवड, गत सत्रातील विद्यार्थी प्रमोशन यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळाचे महत्त्व या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच खिलाडूवृत्ती, नेतृत्वगुण, संघभावना व आरोग्यदायी जीवनशैली विकसित व्हावी, यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षकांची भूमिका अत्यंत मोलाची असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

सभेला मुल व सावली तालुक्यांतील शेकडो शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुल तालुका संयोजक नामदेव पिजदुरकर यांनी केले. सभेचे संचालन ज्येष्ठ शिक्षक के.के. साव यांनी केले, तर आभार प्रदर्शन सावली तालुका संयोजक विनोद बोरकर यांनी केले.

सभेच्या यशस्वी आयोजनासाठी करण कोसरे, नुपूर वाढई आणि संकुलातील कर्मचाऱ्यांपैकी थामदेव रामटेके यांनी विशेष मेहनत घेतली.

ही सभा केवळ नियोजनापुरती मर्यादित न राहता, शालेय क्रीडा चळवळीला नवसंजीवनी देणारी ठरली, असे मत उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!