घरकुलधारकांच्या मोफत रेतीसाठी सावली काँग्रेस आक्रमक - २१ मे पासून आमरण उपोषणाचा इशारा
सावली :- शासनाने घरकुल मंजूर केले मात्र बांधकामासाठी लागणाऱ्या रेतीवर निर्बंध आहे. महाराष्ट्रात रेतीसाठी शासन विरोधात जनभावना असल्यामुळे शासनाने घरकुल बांधकामासाठी मोफत रेती देण्याचा निर्णय घेतला मात्र अंमलबजावणी होत नसल्यामुळे अजूनही घरकुल व इतर कामे रखडली आहेत. वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही रेती उपलब्ध करून देत नसल्याने जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस दिनेश चिटनूरवार यांच्या नेतृत्वात २१ मे २०२५ पासून सावली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे.
सावली तालुक्यात ९४३२ घरकुल मंजूर आहेत. मात्र रेतीअभावी घरकुल अर्धवट स्थितीत आहेत. पावसाळा सुरु होत असल्याने निवारा कुठे करायचा हा प्रश्न घरकुलधारकांमध्ये निर्माण झालेला आहे. ३० एप्रिल २०२५ ला महाराष्ट्र शासनाने घरकुल बांधकामासाठी ५ ब्रास मोफत रेती देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रशासन अंमलबजावणी करण्यास वेळकाढूपणा करीत असून पावसाळा सुरु झाल्यास रेती मिळणार नाही. त्यामुळे रेती वाटपाची कारवाई करण्यात यावी ही मागणी घेऊन २१ मे पासून सावली तालुका काँग्रेसच्या वतीने जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस दिनेश चिटनूरवार यांचे नेतृत्वात सावली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र सावली तहसीलदार, सावली पोलीस स्टेशनला देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष नितीन गोहने, माजी सभापती विजय कोरेवार, बोथलीचे सरपंच सुशील नरेड्डीवार, माजी सरपंच मोखाळा अनिल म्ह्शाखेत्री, उपसरपंच चकपिरंजी अरविंद भैसारे, जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!