असोला चक व सावंगी दीक्षित गावातील प्रकल्पग्रस्ताना अत्यल्प मोबदला - प्रशासन दिशाभूल करीत असल्याचा प्रकल्पग्रस्तांचा आरोप

 

सावली - गोसेखुर्द धरणातील पाणी इंग्रजकालीन असोला तलावात सोडून पाणी साठा वाढविण्याचे दृष्टीने असोलामेंढा नुतनिकरण प्रकल्प सुरु आहे. प्रकल्पात असोला चक व सावंगी दीक्षित ही गावे बुडीत क्षेत्रात असल्याने पुनर्वसन करणे गरजेचे आहे. मात्र या दोन्ही गावातील प्रकल्पग्रस्ताना अत्यल्प मोबदला दिला जात असल्याची ओरड होत आहे.

      सावली तालुक्यात ब्रिटिश काळात सन 1902-03 या काळात शेतीला सिंचन व्हावे यासाठी असोला तलावाची बांधणी करण्यात आली. मात्र त्यानंतर सिंचनाचे क्षेत्र वाढत गेल्याने पाण्याचा तुटवडा निर्माण होत गेला व टेलवर दुष्काळाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे पाणी असोला तलावात साठविण्यासाठी असोलामेंढा नूतनिकरण प्रकल्पाचे काम तत्कालीन सरकारने हाती घेतले. या प्रकल्पात असोला चक व सावंगी दीक्षित ही गावे बुडीत क्षेत्रात येत असल्याने येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सायमारा गावाजवळ करण्यात येणार असून त्या ठिकाणी रस्ते, पाण्याची टाकी व गावठाण जागा तयार करण्यात आली आहे. मात्र पुनर्वसनाचे काम मंद गतीने सुरु असून मागील तीन महिन्यात घरे व घरांची जागा विक्रीपत्र करण्यात आली. घराची विक्री मोबदला कमी दिल्याची ओरड आहे. सानुग्रह मदत किंवा प्रकल्पग्रस्त दाखला यापैकी एकच बाब मिळणार असल्याची अधिकाऱ्यांकडून माहिती दिली जात असल्याने प्रकल्पग्रसतांची दिशाभूल केली जात आहे, सानुग्रह मदत 8 लाख 76 हजार रुपये दिला जाणार असून घर बांधकामसहित वाहतूक खर्च समाविष्ट आहे. 18 वर्षावरील सर्व व्यक्तींना सानुग्रह मदत देण्याची तरतूद असतांना त्यांना मदतीपासून वंचित ठेवल्या जात आहे, अंतरगाव ग्रामपंचायतने विवाहित कुटुंबानी घराची जागा नोंद करण्यास अर्ज केला असतानाही 10-12 वर्षांपासून नोंदी घेतले नाही. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर नोंदी घेतल्या परंतु अनुदानापासून वंचित आहेत, भुसंपादन केल्यानंतर काही जमीन शिल्लक आहे परंतु पुनर्वसन 10 किलोमीटर अंतरावर होत असल्याने उर्वरित शेती करणे अडचणीचे आहे म्हणून शिल्लक जमीन विभागाने खरेदी करण्याची मागणी होत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यानुसार पुनर्वसन झाले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!