बोथलीची आरोग्य सेवा वाऱ्यावर - आरोग्य केंद्र कुलूपबंद करून डॉक्टर गायब
सावली - आरोग्य सेवा ही तातडीची सेवा असून पूर्णवेळ मुख्यालयी राहून रुग्णांना सेवा द्यायचे काम डॉक्टरांचे असतांना मात्र बोथली प्राथमिक आरोग्य केंद्रच कुलूपबंद असल्याने रुग्णांना परत दुसरीकडे जाऊन उपचार करावा लागत असल्याचा प्रकार घडला आहे.
तालुक्यातील बोथली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. काल सायंकाळच्या सुमारास हिरापूर येथील एका इसमाचा अपघात झाल्याने पायाला गंभीर स्वरूपाची जखम झाली. त्याला उपचारासाठी जवळच्या बोथली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले मात्र दवाखानाच कुलूपबंद करून आरोग्य अधिकारी व कर्मचारी गायब झाल्याने उपचारासाठी रुग्ण ताटकळत होते. यावेळी उपचारासाठी सहा वर्षाची मुलगीही होती. उपचार करण्यासाठी कोणीही उपलब्ध नं झाल्याने सावली येथे रुग्णांना जाऊन उपचार करावा लागला. मात्र रुग्णवाहीका सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली नाही. यामुळे गावात संताप व्यक्त होत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पेशंट आले असता दवाखाना बंद होता. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना याबाबत फोनवर माहिती दिली परंतु त्यांचेकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
सुशील नरेड्डीवार
सरपंच ग्राम पंचायत बोथली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!