प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ब्रह्मपुरीच्या लिमंत्रिका ने पटकावले दुहेरी सुवर्ण पदक

ब्रह्मपुरीच्या शिक्षिकेची प्रेरणादायक कथा

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - जीवनात सुखाचे दिवस अलगद निघून जातात. मात्र अचानक आलेली एखादी आपत्ती खूप काही शिकवून जाते, किंबहुना ती घटना पुढील जीवनासाठी मार्गदर्शक ठरते. असाच काहीच प्रकार ब्रह्मपुरी येथील लिमंत्रिकाच्या बाबतीत घडला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत दुहेरी सुवर्णपदक पटकावणाऱ्या महिलेची ही यशोगाथा.लग्नानंतर लिमंत्रिका ब्रह्मपुरी ला आली. पती सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी पदावर कार्यरत सर्व काही सुरळीत सुरू होतं. दिवसभर घरचे काम करायची, उरलेल्या वेळेत वाचन करायचे असा दिनक्रम सुरू होता. त्यावेळी तिचे फक्त एका विषयात एम.ए.झाले होते. तिची वाचनाची आवड पाहून पतीने आणखी अभ्यास करण्यासाठी तिला प्रवृत्त केले. मुळातच अभ्यासाची आवड असलेल्या लिमंत्रिका ने जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. एक - एक करत इतर विषयात एम.ए.च्या परीक्षा देणे सुरू होते. सर्व काही सुरळीत सुरू होतं, मात्र नियतीला हे मान्य नव्हतं. अचानक पती दगावले. काही काळ तिला काहीच सुचत नव्हतं. दोन मुलींसाठी स्वतःला सांभाळणं भाग होतं. पतीचे शब्द तिला आठवले कोणतेही संकट आले तरी विचलित न होता, धैर्याने संकटाला तोंड दे. ती पुन्हा कणखरपणे उठून उभी राहिली. प्रयत्नांची पराकाष्ठा करीत शिक्षिकेची शासकीय नोकरी मिळविली. एवढेच नाही तर एका मागे एक यशोशिखर पादाक्रांत करीत तब्बल पाच विषयात एम.ए. पूर्ण केले.इतिहास विषयात पदव्युत्तर परीक्षेत गोंडवाना विद्यापीठातून दुहेरी सुवर्णपदक पटकावल्याने संपूर्ण महाराष्ट्रात सध्या लिमंत्रिका भगवान नवघडे ( श्रीमती अनघा अविनाश दंडवते) चर्चेतआली आहे.गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात नुकताच अकरावा आणि बारावा दिक्षांत समारोह पार पडला. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांच्या हस्ते लिमंत्रिका ला दुहेरी सुवर्ण पदक देण्यात आले. या सत्कार सोहळ्याला वनमंत्री  सुधीर मुनगुंटीवार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रा.कुलगुरू डॉक्टर श्रीराम कावळे, कुलसचिव डॉक्टर अनिल हिरेबन प्रामुख्याने उपस्थित होते. लिमंत्रिका ला मिळालेल्या यशाने ब्रह्मपुरी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.यांचे संपूर्ण शिक्षण नेवजाबाई हितकारिनी महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!