बापरे! वाघ शेतकऱ्याच्या समोरा समोर - बसचालक ठरला देवदूत
मुल - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाघ कधी आणि कुठे दिसणार, हे सांगणे कठीण झाले आहे. वाघाचे नाव ऐकताच ग्रामस्थांचा थरकाप उडतो आणि तो अचानक समोर आला तर भीतीने बोलणेही बंद होते. असाच प्रकार नागभीड तालुक्यात उघडकीस आला. गोविंदपूर रस्त्यावर मंगरुडजवळ एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ उभा ठाकला. त्यामुळे शेतकऱ्याची बोबडी वळली. मात्र, त्याच वेळी तिथे एसटी महामंडळाची बस आली. बसचालक या शेतकऱ्यासाठी देवदूतच ठरला. चालकाने प्रसंगावधान राखत शेतकऱ्याला बसमध्ये घेऊन त्याचे प्राण वाचविले.
सध्या सर्वत्र मुसळधार, संततधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. गोविंदपूर येथील रामदास खांदेवे नामक शेतकरी मंगरूड गावातील शेतात काम करण्यासाठी सायकलने गेले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काम आटोपून ते सायकलने गोविंदपूर या गावी परत येत होते. मंगरूड ते गोविंदपूर मार्गावरील कालव्याजवळील नागमोडी वळणावर खांदेवे यांच्या पुढे अचानक वाघ उभा ठाकला. शेतकरी व वाघ दोघेही एकमेकांसमोर उभे, दोघांच्या मागेपुढे कोणीच नाही. वाघ पाहून शेतकरी अवाक झाला. दोघांची नजरानजर झाली. वाघ हालचाल करणारच एवढ्यात एसटी बस त्याच रस्त्याने आली. बसचालक नव्हे तर साक्षात देवदूतच शेतकऱ्यासाठी धाऊन आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!