मूल पोलिसांची झपाट्याने कारवाई; अवघ्या ८ तासांत आरोपी जेरबंद

मूल पोलिसांची झपाट्याने कारवाई; अवघ्या ८ तासांत आरोपी जेरबंद, चोरीची दुचाकी जप्त

Photo AI generated

मूल शहरातील प्रभाग क्रमांक ७ येथे घडलेल्या घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या प्रकरणात मूल पोलिसांनी अतिशय तत्पर व प्रभावी कारवाई करत अवघ्या ८ तासांच्या आत आरोपींना अटक करून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत केली. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वशांती शाळा भेंडाळा येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले भोपसिंग पवार हे स्वगावी गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून घरफोडी केली. घरातील काही किरकोळ साहित्य चोरून नेल्यानंतर चोरट्याने दुचाकीची चाबी घेत अंगणात उभी असलेली Passion दुचाकीही लंपास केली.
घटनेची माहिती मिळताच मूल पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली. ठाणेदार विजय राठोड साहेबांनी पहाटेच प्राप्त झालेल्या फोननंतर आवश्यक सूचना देत पोलिस पथक घटनास्थळी रवाना केले. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. तसेच चोरीस गेलेली दुचाकीही जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
तक्रार नोंदविण्याच्या प्रक्रियेत पोलिस उपनिरीक्षक उत्तम कुमरे  यांनीही पुढाकार घेत संबंधित व्यक्तींना संपर्क करून पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. पोलिस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आलेल्या दुचाकीचा फोटोही संबंधितांना दाखवण्यात आला.
मूल पोलिसांच्या या तत्पर आणि परिणामकारक कारवाईबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये अशा वेगवान कारवाईमुळे पोलिसांवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!