सिंचन विहीर बांधकामाची रक्कम अडकली - लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये संताप @ मजुरांची मजुरीही तीन महिन्यापासून थकीत

सिंचन विहीर बांधकामाची रक्कम अडकली - लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये संताप 

@ मजुरांची मजुरीही तीन महिन्यापासून थकीत 

सावली - (विजय कोरेवार)

मागेल त्याला सिंचन विहीर ही वयक्तिक योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने योजना राबविली जाते. सदर योजनेंतर्गत सिंचन विहिरीचे बांधकाम करणाऱ्या शेतकऱ्यांना मागील 3-4 महिन्यापासून अनुदान न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. इतरही कामाची अकुशल मजुरांची कोट्यावधी रुपयाची मजुरी 3 महिन्यांपासून थकलेली आहे त्यामुळे लाडक्या म्हणवून घेणाऱ्या सरकारविरुद्ध शेतकरी व मजुरांमध्ये रोष निर्माण होत आहे.

    शेतीला सिंचनाची सोय व्हावी, गावातील मजुरांना गावातच काम मिळावा या उद्देशाने शेतकऱ्यांसाठी चार लक्ष रुपये किंमतीची सिंचन विहीर बांधकामाची योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरु आहे. सावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर वासनिक यांनी ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले. या योजनेतर्गत पांदन रस्ते, तलाव, बोडी, अशी सार्वजनिक तर सिंचन विहीर, गुरांचा गोठा, सौचालय, शोषखड्डे हे वैयक्तिक लाभाची कामे करण्यात येतात. सावली तालुक्यात 139 विहिरीचे बांधकाम जानेवारी ते जून या कालावधीत झाले. या योजनेंतर्गत अकुशलचे अनुदान मजुरांच्या खात्यात तर कुशलची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते. एकूण चार लाख अनुदानापैकी मजुरी 1लाख 47 हजार तर उर्वरित रक्कम साहित्यासाठी दिल्या जाते. सिंचन विहिरीचे अनुदान सरळ बँक खात्यात शासनाकडून जमा केल्या जाते. ही रक्कम जिल्हा स्तर किंवा तालुका स्तरावर राहत नाही. विहिरीचे बांधकाम झाल्यानंतर अकुशल मजुरीची रक्कम काहींच्या खात्यात जमा झाली तर काही मजुराना काहीच मिळाले नाही. साहित्याची रक्कम तर काहीच मिळाली नाही. शेतकऱ्यांनी आपल्याकडील रक्कम खर्च करून, साहित्य उधारीवर घेऊन विहिरीचे बांधकाम केले मात्र ही अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. तसेच केवळ सावली तालुक्यातील रोजगार हमीच्या कामावरील अकुशल मजुरांची मजुरी चार कोटी रुपये थकीत आहे. त्यामुळे मजु्रांमध्ये शासनाविरुद्ध संताप आहे. 


मार्च महिन्यात विहिरीचे बांधकाम केले. मजुरांना नगदी रक्कम देऊन व दुकानदाराकडून साहित्य उधारीवर घेऊन बांधकाम केले. पण मजुरीचे फक्त 80 हजार रुपये जमा झाले उर्वरित रक्कम अजूनपर्यंत मिळालेली नाही. दुकानदाराकडील सिमेंट, लोहा या साहित्याच्या उधारीची रक्कम कशी चुकवावी हा प्रश्न पडला आहे.

परशुराम मर्लावार 

 सिंचन विहीर लाभार्थी 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!