वन्यप्राण्यातील जखमी व्यक्तींना नुकसान भरपाई नाहीच - शासकीय परिपत्रकात दुरुस्ती होणे आवश्यक
वन्यप्राण्यातील जखमी व्यक्तींना नुकसान भरपाई नाहीच - शासकीय परिपत्रकात दुरुस्ती होणे आवश्यक
सावली (विजय कोरेवार) - ग्रामीण व वनभागातील शेतकरी, शेतमजूर, वनमजूर, गुराखी, मेंढपाळ यांचे वन्यप्राण्यांचे हल्ले रोजचे झालेले आहेत. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमींना नुकसान भरपाई देत असल्याचा कांगावा वनविभागाकडून केल्या जात असला तरी आठवडाभर दवाखान्यात भरती व महिनाभर काहीच काम करू न शकणाऱ्या व्यक्तींना किरकोळ जखमीचे प्रमाणपत्र असल्यास शासकीय परिपत्रकात भरपाई देण्याची तरतूद नसल्याने शेकडो व्यक्ती मदतीपासून वंचित राहत आहेत.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्ती मृत पावल्यास २० लक्ष रुपये कुटुंबाला मिळतात तर कायम अपंगत्व आल्यास ५ लक्ष रुपये, गंभीर जखमींना १.२५ लक्ष रुपये तर किरकोळ जखमींना औषधोपचार खर्च देण्याची तरतूद वनविभागाच्या परिपत्रकात आहे. जखमीचे प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सक देतात. अनेक प्रकरणात असे आढळून आले आहे की, वाघ, बिबट व इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्याने आठवडाभर उपचारासाठी भरती होऊन जखम दुरुस्ती होईपर्यंत कोणतेही काम करता येत नाही मात्र त्याचे प्रमाणपत्र किरकोळ मिळाल्याने कोणताच लाभ वनविभागाकडून मिळत नाही. उपचारादरम्यान त्याची व नातेवाईकांची रोजीरोटी बुडाली त्याची भरपाई वनविभागाकडून मिळणे आवश्यक आहे. सावली तालुक्यातील चांदली बूज. येथील मेंढपाळ बंडू मद्रीवार हे शेतशिवारात मेंढ्या चारत असताना वाघाने हल्ला केला त्यात डोक्याला जखम झाली. सुरवातीला ग्रामीण रुग्णालय सावली येथे उपचाराकरिता भरती केले त्यानंतर जखमींची अवस्था पाहून जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. आठवडाभर दवाखान्यात उपचार घेत होते त्यानंतर जखम बरं होण्यासाठी रोजीरोटी सोडून महिनाभर घरी राहावे लागले. जेव्हा मेडीकल सर्टीफिकेट वनविभागाकडे दिले तर किरकोळ जखम असल्याने काहीच मदत मिळणार नसल्याचे सांगितले. तसेच चांदली बूज येथील बंडू शिर्गावार, मुल येथील शरद रेगडवार अशी शेकडो प्रकरणे आहेत. परिपत्रकात किरकोळ जखमींना फक्त बाहेरील औषधोपचार केल्यास औषधींचा खर्च देण्याची तरतूद असून शासकीय वैद्यकीय अधिकारी यांची बिलावर सही घेणेही बंधनकारक आहे. शक्यतो वनप्राण्यांच्या हल्ल्यात जखमींनी शासकीय दवाखान्यातच उचार करावा असेही परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे किरकोळ जखमींना बरे होईपर्यंत मजुरीप्रमाणे तरी भरपाई मिळावी अशी तरतूद वनविभागाने परिपत्रकात करावी अशी मागणी होत आहे.
#sudhirmungantiwar



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!