दांडी बहाद्दर गुरुजीला सिईओचे अभय - कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत धूळखात ® गुरुजी परत दिल्यास गावकऱ्यांची आंदोलनाची भूमिका



सावली - (विजय कोरेवार) 
राजोली चक क्र. 2 (फाल) येथील जिल्हा परीषद शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद चांदेकर हे शाळेत नियमित उपस्थित न राहता दांडी मारत असल्याची तक्रार अनेकदा करूनही काहीच कारवाई होत नसल्याने पालक - विद्यार्थी वैतागले आहेत. आता हे शिक्षक नकोच असा सूर पालक वर्गात उमटत आहे तर सदर शिक्षकावर कारवाई न होण्यामागे अर्थकारण आहे असा आरोपही होत आहे.
      सावली तालुक्यातील राजोली चक क्र 2 (फाल) येथे इयत्ता 1 ते 4 असून 2 शिक्षक कार्यरत आहेत. अशिक्षित आई वडील दिवसभर कामाला असतात त्यामुळे मुले घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते मात्र तेच शिक्षक शाळेला दांडी मारत असतील तर विद्यार्थी कसे घडतील ही कल्पना न केलेली बरी. येथील मुख्यद्यापक मिलिंद चांदेकर हे नियमित गैरहजर राहतात, शाळेत आले तरी फोनवर इतर व्यवसायाच्या गोष्टी  बोलत असतात, मध्येच शाळेच्या वेळेत कधीही निघून जातात, गैरहजर दिवशीचीही हजेरी मस्टरवर लावतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीनतेरा झाले आहे. सदर शिक्षकाला पालक बोलले तर माझे कुणी वाकडे करीत नाही, जास्त केलात तर तुमच्यावरच केस करेन अशी धमकी देतात, पत्रकारांना सुध्दा माझेविरुद्ध लिहिल्यास कारवाईची धमकी देतात. मी करोडपती आहे मला नोकरी करण्याची गरज नसल्याचे सांगत असताना मात्र दरमहा शासनाकडून पगार घेत असतात. यापूर्वी मुल तालुक्यातील कांतापेट येथे असताना सुध्दा हाच प्रकार सदर शिक्षकाने केल्याने कारवाईचा प्रस्ताव तयार झाला असल्याची माहिती आहे परंतु त्याचे पुढे काय झाले कुणालाच कल्पना नाही. राजोली फाल येथे कोरोना काळात सहायक शिक्षक पालकांच्या संपर्कात राहून शाळेबाहेर ही शिकवीत असताना मात्र हे महाभाग शिक्षक कोणत्याच पालकांसोबत संपर्कात नव्हते. पालकांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्या परंतु शिक्षकाचे आर्थिक वजन एवढे आहे की वरिष्ठसुध्दा बळी पडत आहेत. तत्कालीन सभापती विजय कोरेवार यांच्या भेटीत हे महाभाग शिक्षक गैरहजर आढळले होते. त्यावेळी शिक्षण विभागाला चौकशी करायला लावून प्रस्ताव जिल्हा परिषदेत पाठवले. त्यानंतर चीचबोडीचे सरपंच सतीश नंदगिरवार यांनी पालकांसह तक्रार करून आंदोलनाचा इशारा दिला असता गटशिक्षणाधिकारी लोकेश खंडारे यांनी पालकांचे बयान व रेकॉर्डची चौकशी करून कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदला पाठवला. सद्या हे शिक्षक सुदृढ असताना
महिन्याभरापासून वैद्यकीय रजेवर आहेत. चार वर्गाचा भार नेहमीप्रमाणे एका शिक्षकावर आहे त्यामुळे विद्यार्थी शिक्षणात किती तरबेज असतील याची कल्पना येते. 
अशा महाभाग शिक्षकाला विद्यार्थी व पालक कंटाळलेले असताना अनेकदा कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदला पाठवला असताना शिक्षणाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने आर्थिक संबंधामुळे कारवाई होत नसल्याची ओरड पालक, गावकरी करीत आहेत. 

चांदेकर शिक्षक वैद्यकीय रजेवर असल्याने  शाळा सुरळीत सुरु आहे. त्यांना या शाळेवर पुन्हा पाठवू नये. अन्यथा गावकऱ्यांना घेऊन पंचायत समितीला तीव्र आंदोलन करू.
सतीश नंदगिरवार 
सरपंच ग्रा. पं. चिचबोडी 

चांदेकर शिक्षक सुट्टीवर असल्यामुळे त्यांचे ऐवजी नंदनवार शिक्षक तात्पुरते दिले आहे. झाडे व नंदनवार शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रगती दिसत आहे. अनेक वर्षानंतर गणराज्यदिनी सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्यामुळे आमच्या शाळेत चांदेकर शिक्षक नको.
शामराव बाबनवाडे 
माजी सरपंच गट ग्रामपंचायत चिचबोडी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!