भिसी येथील बुद्ध विहार ते वाही पर्यंतच्या डांबर रस्त्याचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे
भ्रष्टाचार लपविण्यासाठी घाईगर्दीत सुरु आहे बांधकाम?
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - शंकरपूर - जामगांव - चिमूर या नवनिर्मित महामार्गाच्या बुद्ध विहार ते वाही पर्यंतच्या उर्वरित तुकड्याच्या डांबर रस्त्याच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ठ असून बांधकामातील भ्रष्टाचार समोर येऊ नये म्हणून बांधकाम ठेकेदार खूप घाईने रस्त्याचे बांधकाम करीत आहे, असा संशय बळावत आहे.सदर डांबर रोड हा महामार्गाचा भाग असून सध्या रस्त्याचे बांधकाम बुद्ध विहार शनिवारपेठ वस्तीतून जामगांव च्या दिशेने गावाच्या शेवटचे टोक वाही स्थळापर्यंत चालू आहे. त्यापुढील जामगांवच्या दिशेने डांबर रस्त्याचे बांधकाम आधीच पूर्ण झाले आहे.बुद्ध विहारापासून देविदास कोटनाके यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूचा अर्धा भाग एका वर्षाआधी बांधकाम ठेकेदाराने खोदला होता. खोदलेल्या जागेत फोर्टी एम. एम. ची काळी बोल्डर गिट्टी टाकून तिची दबाई करण्यात आली होती. परंतु भुतारी बोडी परिसरातील एका जमिनीच्या वादावरून पुढे खोदकाम थांबले. एका वर्षापर्यंत काम बंद होते.24 मार्चंपासून काम पुन्हा सुरु झाले. पण फक्त जुना डांबर रस्ता उखरून तोच मलबा रस्त्यात दाबण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला व माध्यभागी खोदकाम करून आधी फोर्टी एम. एम. ची गिट्टी दाबायला हवी होती. ते न करता ठेकेदाराने बुडात उखरलेल्या जुन्या डांबर रस्त्याचा मलबा दाबला व त्यावर चुरीमिश्रित थर्टी गिट्टीचा थर टाकला. याबाबत बांधकामाच्या ठिकाणी हजर असलेल्या ठेकेदाराच्या माणसाला विचारले की, आधी तुम्ही रस्ता खोदून काही ठिकाणी फोर्टी एम. एम. ची गिट्टी रस्त्यात दाबली होती.आता तसे न करता, खोदकाम न करता थेट बारीक गिट्टी टाकून काम का करत आहात? बांधकामाचे इस्टीमेट दाखवा. तर त्यांच्याकडून सांगितल्या गेलं की, इस्टीमेट सार्वजनिक बांधकाम विभागात असते. जुने इस्टीमेट बदलले असेल. आम्हाला वरिष्ठ पातळीवरून जसे सांगण्यात येते तसे काम आम्ही करतो.यावरून सामान्य नागरिकाला इस्टीमेटनुसार बांधकाम होते की नाही, याची शहानिशा करायची असेल तर तो बांधकाम विभागात चकरा मारणार की डोळ्यासमोर घडणारा गैरप्रकार बघून काम बंद करण्यास सांगणार? खालपासून वरपर्यंत, नेत्यांपासून कर्मचाऱ्यापर्यंत ठेकेदाराने बहुतेकांचे हात ओले केलेले असतात, म्हणून ठेकेदार मनमर्जीने भ्रष्टाचार करू शकतात, असे चित्र आज सर्वत्र दिसत आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे प्रभारी अभियंता उपगंडलावार यांना विचारले असता ते म्हणाले की, मी नागभीडला आमदार साहेबांच्या मीटिंगला जात आहे. तुम्ही तीन - चार दिवसांनी चिमुरला कार्यालयात येऊन तुमची समस्या सांगा. बांधकाम विभाग तक्रारीची दखल घेईपर्यंत ठेकेदार निकृष्ठ बांधकाम पूर्ण करून निघून जाईल.त्यानंतर खराब रस्ता खोदून सार्वजनिक बांधकाम विभाग नवीन रस्ता बनवून देणार आहे का, असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.
आ. बंटीभाऊ भांगडिया यांच्याकडे सदर गैरप्रकाराची तक्रार करण्यासाठी दोनदा मोबाईलवर संपर्क केला ; पण त्यांनी फोन न उचलल्यामुळे त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही. वृत्त लिहून होईपर्यंत आ. भांगडिया यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही.करोडो रुपयांचे रस्ते मंजूर झाले आहेत. पण ते दर्जेदार नसतील,मंजूर इस्टीमेटनुसार बांधल्या जात नसतील, कामाचा दर्जा निकृष्ठ असेल, तर अशा रस्त्यांचा नागरिकांना काय फायदा? केवळ ठेकेदारांची तिजोरी भरण्यासाठी निकृष्ठ रस्ते बांधले जात आहेत का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.एक वर्षांपासून थांबून असलेले बांधकाम सुरु झाले, याचा आनंद होण्याऐवजी रस्त्यातील भ्रष्टाचार बघून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर येथील मुख्य अभियंत्यांनी सदर बांधकामाची चौकशी करून दर्जेदार रस्ता बांधून द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!