कोविड योध्दे महिला कामगारांना झोडपण्याचीश् पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांची भाषा खरचं नैराश्येतून निघाली काय ?
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी काल चंद्रपुरातील डेरा आंदोलन करणाऱ्या महिला कोविड योध्दाचे संदर्भात 'पोलिसामार्फत झोडपून काढू' असे केलेले विधान, हे निश्चितच निषेधार्ह आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे जनविकास सेनेचे अध्यक्ष, नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेले विधान हे त्यांच्या नैराशेतून केले असावे असा कयास लावला. खरं तर याबाबत ते, कामगार एैकत नसतील तर पर्यायी उपाय योजण्यात येईल अशा शब्दातही भूमिका घेता आली असती. मात्र त्यांचे 'झोडपून' काढू हे विधान, मागील काही दिवसांची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर निश्चितच नामदार वडेट्टीवार यांचे नैराशेतून असावी असे म्हणण्यास वाव आहे.
प्रशासकीय पातळीवर नामदार विजय वडेट्टीवार यांचा फारसा 'कंट्रोल' नाही हे मागील दीड वर्षात वेळोवेळी दिसून आलेले आहे. त्यांनी दिलेले कोणतेही आश्वासन पूर्णत्वास गेले असावे असे क्वचितच घडलेले आहे. उदाहरणच द्यायचे म्हणजे लाकडाऊन च्या काळात चंद्रपूर जिल्ह्यातील गरिबांना 40000 किटचे ते वाटप करणार होते मात्र या कीट वाटपावरून राजकीय गोंधळ झाला आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की आपण बारा हजार कीट पर्यंतच मदत गोळा करु शकलो! चंद्रपूर जिल्ह्यातील विशेषत: त्यांच्याच ब्रह्मपुरी निर्वाचन क्षेत्रात असलेल्या, सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी या भागातील स्थलांतरित मजूर मोठ्या प्रमाणावर मिरची तोडण्यासाठी तेलंगाना, आंध्र प्रदेशात मागील लाकडाऊन च्या काळात अडकले होते. या प्रश्नावर त्यांनी या सर्व मजुरांना सुखरूप गावापर्यंत आणण्याची ग्वाही दिली. मात्र वेळेवर बसेस पाठविण्यास असमर्थता दाखवून हे आश्वासनही त्यांनी पूर्ण केले नाही. निवडून येण्याच्या आधी आणि नंतरही गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत करण्याची घोषणा त्यांनी वारंवार केली मात्र अद्यापही ही घोषणा पूर्णत्वास आली नाही. त्यांचेच मदत आणि पुनर्वसन विभागाने कोकणातील चक्रीवादळ ग्रस्तांना घराचा मोबदला म्हणून दीड लाख रुपये मोबदला देण्यात आले मात्र स्वतःच्या मतदारसंघात ते 95 हजार रुपये (तेही अनेकांना अजून पर्यंत मिळाले नाही) मंजूर करावे लागले. जी—जी भरपाई कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना, साताराच्या पूरग्रस्तांना, कोकणातील चक्रीवादळ ग्रस्तांना देता आली, त्यातली 25% मदतही त्यांना स्वतःच्या मतदारसंघात देता आली नाही हे वास्तव आहे. त्यानी वारंवार रेती तस्करांवर, दारू तस्करावर (???) कडक कारवाई करावी, असे प्रशासनाला आदेश दिलेत. मात्र त्याचाच मतदार संघ असलेला ब्रम्हपुरी निर्वाचन क्षेत्रातील सावली, सिंदेवाही, ब्रम्हपुरी तालुका हे रेती तस्करीचे 'हब' झाले आहे. यामुळेच त्यांचे नैराश्याची भावना निर्माण झाली असावी या पप्पू देशमुख यांच्या मताशी निश्चितच आम्ही सहमत आहोत.
खरं म्हणजे नामदार विजय वडेट्टीवार यांनी एक कामगार नेता म्हणून पप्पू देशमुख यांचे कौतुक करून, चंद्रपुरात गरीब, निर्धन, दलित, आदिवासी, मागासवर्गीय असलेल्या सफाई कामगारांचे सात महिन्यापासून वेतन मिळवून देण्यास स्वतः पुढाकार घ्यायला पाहिजे होता. नामदार विजय वडेट्टीवार हे आता स्वतः कामगार नेते आहे त्यांचेच मार्गदर्शनात 'विजय क्रांती कामगार संघटना' अस्तित्वात आली आहे आणि एक कामगार नेत्याच्या तोंडी कामगारांच्या प्रश्नावर कामगारांना झोडपून काढण्याची भाषा हे निश्चितच कामगार नेत्याला भूषणावह नाही.
डेरा आंदोलन करणाऱ्या महिला कामगारांची मागणी काय ? तर त्यांनी केलेले सात महिन्याच्या कामाचा किमान वेतनाप्रमाणे मोबदला मिळावा. केलेल्या कामाचा मोबदला मागणे हा गुन्हा आहे काय ? किमान वेतन याप्रमाणे मजुरी मागणे हा गुन्हा आहे काय ? उलट किमान वेतनाचा कायदा काँग्रेस सरकारच्या काळात काळातच तयार झाला. त्यामुळे काँग्रेसच्या मंत्र्यांनी मजुरांना किमान वेतन का मिळत नाही ? हा जाब अधिकाऱ्यांना, ठेकेदारांना विचारायला हवा. मात्र तसे न करता पालक मंत्री महोदय सगळीकडेच असेच कंत्राट चालू आहेत. ठेकेदाराला दहा हजार मिळेल तर तो 15000 कुठून देईल ? अशी ठेकेदार धर्जीनी बाजू घेऊन बोलत असल्याचे ऑडिओ वायरल झाले आहेत. ठेकेदाराला किमान वेतनापेक्षा शासन कमी देत असेल तर ही चूक कोणाची आहे ? मजुरांना किमान वेतन मिळाले पाहिजे असे दर ठेकेदारांना देण्याची जबाबदारी हे निश्चितच सरकारची आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यात नामदार विजय वडेट्टीवार हे सरकार आहेत!
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नैराश्येचे आणखी एक कारण दारूबंदी हा सुद्धा असू शकते. कारण त्यांनी आजपर्यंत वेळोवेळी दारू सुरू होण्याचे 'तारीख पे तारीख' दिलेली आहे आणि एकही तारीख अजून पर्यंत पाळलेली दिसून आलेले नाही उलट मुंबईतील उत्पादन शुल्क विभागाचे टीमने नामदार विजय वडेट्टीवार यांचे थेट ब्रह्मपुरी येथे जाऊन त्यांचे अत्यंत जवळचे नगरसेवक महेश भर्रे यांचे घरात धाड मारली आणि तीनशेच्या वर दारूच्या पेट्या पकडल्या. वरकरणी ही जरी साधी धाड वाटत असली तरीही, कधी नव्हे ती पहिल्यांदा मुंबईवरून अवैध दारू पकडण्यासाठी उत्पादन शुल्क खात्याची टीम आली आणि ती जिल्ह्याच्या मोठ्या अवैध दारू विक्रेत्याच्या अड्ड्यावर धाड न मारता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या खास व्यक्तींची दारू पकडते, यावरून मुंबईच्या मंत्रालयात नामदार विजय वडेट्टीवार यांचे अंतर्गत छुपे दुश्मन निश्चितच बसले असावे आणि यातूनही हे नैराश्य आले असावे असे म्हणणे खोटे होणार नाही.
एकीकडे काँग्रेस चार महिन्यापासून दिल्लीत बसलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून, राज्यात बंद, बंदला समर्थन, निषेध मोर्चे काढत आहे. तर दुसरीकडे चंद्रपुरात सात महिन्यापासून वेतन मागणाऱ्या महिला कोविड योद्धांना झोडपून काढण्याची भाषा काँग्रेसचे वरिष्ठ मंत्री नामदार वडेट्टीवार करत आहे. काँग्रेसचे आंदोलनप्रती नेमकी भूमिका काय आहे? दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा आणि आपल्या जिल्ह्यातच वेतनासाठी लढणाऱ्या आंदोलकांना झोडपून काढा ?
राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना, कोरोनाची दुसरी लढाईही आपण जिंकू असा विश्वास व्यक्त केला. कोरोनाची पहिली लढाई लढणाऱ्या आणि ती जिंकणाऱ्या कोविड योद्धांना सात—सात महिने पगार न देता उपाशीपोटी दुसरी लढाई कशी लढणार ? आणि त्यांचेच मंत्री या लढणाऱ्या कोरोना योद्धांचे वेतनाचे प्रश्न न सोडविता त्यांना झोडपून काढण्याची भूमिका घेणे, हे महाराष्ट्राचे पुरोगामित्व आहे काय ? हे पुरोगामी सरकार आहे काय ? महाविकास आघाडीचा हाच अजेंडा आहे काय ? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
विजय सिद्धावार


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!