दीडशे एकराच्या वनव्याप्त जमिनीवर रोपवन उभारण्याचा घाट


वनविभागाने शेतक-यांचा चराईचा क्षेत्र हिरावला - शोभाताई फडणवीस
आंदोलन करण्याचा इशारा
मूल (प्रतिनिधी)
जंगल व्याप्त क्षेत्र असूनही येथील कर्मवीर महाविदयालयाच्या मागे असलेल्या परिसरात दीडसे एकरात तीन रोपवने उभारण्याचा घाट वनविभागाने बांधला आहे. हा कार्यक्रम वनविभागाच्या उच्च पदस्थ अधिका-यांनी गुगल मॅप वरून तयार केला आहे. त्यामुळे मूल परिसरातील शेतक-यांना याचा फटका बसणार आहे. शेकडो जनावरे चराई क्षेत्रापासून वंचीत राहण्याची भिती माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.वनविभागाने हा रोपवनाचा कार्यक्रम थांबविला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन घोषीत करीत असताना त्या क्षेत्रातील नागरिकांना आणि आदिवासींना मिळणारे विविध हक्क शाबूत ठेवूनच बफर झोनला मान्यता मिळाली आहे.परंतु वनविभाग वारंवार  नियमभंग करून निस्तार हक्क,तेंदूपत्ता तोडाई हक्क,चराई हक्क तसेच विविध मुलभूत हक्कांवर गदा आणित आहे.कायदयाने नागरिकांच्या हक्कांवर पाणी फेरता येत नाही. गुगल मॅप वरून अभ्यास करून मूल येथील कर्मवीर महाविदयालयाच्या मागे असलेल्या दीडसे एकरात रोपवनाचा कार्यक्रम त्यांनी आखला आहे. हा काळया गोटयाचा परिसर म्हणून प्रसिदध आहे. वास्तविक पाहता हा परिसर जंगल व्याप्त असून याला पडीत जमिन दाखवून शेतक-यांच्या हक्कावर गदा आणित आहे.तीन रोपवने येथे तयार केली जाणार आहे. हा परिसर पूर्वीपासून चराईक्षेत्र म्हणून घोषीत असताना शेतक-यांनी आपली स्वतःची जनावरे चराई साठी न्यावी कुठे असा प्रश्न त्यांनी वनविभागाला विचारला आहे.
पूर्व विदर्भात तीस ते पस्तीस टक्के जंगल असताना नवीन रोपवने तयार करण्याचा घाट कश्यासाठी आखला जात आहे,हे एक कोडेच आहे.दिवसेंदिसव वनकायदे जाचक ठरत असून नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत.त्यामुळेच बफर झोन घोषीत करीत असताना 84 ग्रामपंचायतींनी याला विरोध दर्शविला होता. अशी माहिती यावेळी शोभाताई फडणवीस यांनी दिली.वनविभाग फक्त जंगली श्वापदांचा विचार करीत आहे. जंगल परिसरातील शेतक-यांनी,आदिवासींनी जावे कुठे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांचे हक्क डावलून वनविभागाने आखलेला रोपवनाचा कार्यक्रम चुकीचा असून याच्या विरोधात शेतक-यांसह आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. पत्रकार परिषदेला भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते अविनाश जगताप उपस्थित होते.
रोपवनाचे काम ताबडतोब बंद करावे आणि आम्हाला आमचे हक्क दयावे यासाठी शनिवारी मूल परिसरातील शेतक-यांसह त्यांनी वनविभागाला एक मागण्याचे निवेदन सादर केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!