रामदेगी - एक पर्यटन स्थळ

रामदेगी - एक पर्यटन स्थळ (चंद्रपूर) 


शंकरपूर
वरोरा ते चिमूर महामार्गावर शेगाव नंतर 12 किमी अंतरावर गुजगव्हान फाटावरून आत 4 किमी वर रामदेगी हे आकर्षून घेणारं पर्यटन स्थळ आहे. सध्या वरोरा ते चिमूर या महामार्गाचे नूतनीकरणाचे कार्य वेगाने सुरू आहे व लवकरच हा महामार्ग सुस्थितीत येणार असल्याचे सूचक चिन्हे कार्यगती वरून दिसताहेत.

रामदेगी हे नैसर्गिक घनदाट वनराईने वेढलेले असे प्रेक्षणीय स्थळ असून उंच डोंगराच्या पायथ्याशी हेमाडपंथी शिवमंदिर उभे आहे. शिव मंदिराच्या बाजुला राम मंदिर असून भव्य खडकाचा डोंगर जणू या मंदिराचा परकोट असल्याचे दिसते. विस्तीर्ण पसरलेल्या या घनदाट जंगलात वन्य प्राण्यांचा वावर असून बिबट व वाघ वास्तव्यास असल्याचे बोलले जाते. खरं तर वन्य प्राण्यांचा वावर असणे हा नैसर्गिक असून मानवाने आपल्या सोयीने अश्या स्थळांचा वापर चालविला आहे. येथे असलेली छुपी गुफा पाहण्यासाठी बंदी केली असून नैसर्गिक तयार झालेले दगडी पहाडावरील बारमाही पाण्याचे कुंड व इतर निसर्ग जीव सृष्टीस मानवाच्या अधिवासाने व वापराने हा ठेवा अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. या दगडी पहाडवरून सूर्यास्ताचे विलोभनीय असे दर्शन होते. चर्मचक्षुत साठवून घ्यावे इतके अतीव, सुंदर व निरव शांतता असलेले असे हे स्थळ.

रामदेगी हे चंद्रपूर जिल्ह्यातील निसर्गरम्य पण फार परिचित नसलेले ठिकाण. रामदेगी चिमूर तालुक्यात आहे. आनंदवनापासून शेगाव बुद्रुक हे आठवडी बाजाराचे गाव ओलांडले, की पुढे चारगाव धरण लागते. चारगाव धरण पाहण्यासारखे आहे. त्या तलावातून इरई नदीचा उगम झालेला आहे. इरई नदीच्या प्रवाहाचे पाणी पुढे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. तलावात मगरी व मोठे मासे आहेत. तेथे मासेमारीचा उद्योग चांगला तेजीत असतो. गुजगव्हाणहून रामदेगीला जात असताना ‘चंदई नाला’ पडतो त्या ठिकाणी लोखंडी पूल बांधलेला आहे. पावसाळ्यात पाणी असताना त्या परिसरात गहू, हरभरा, झेंडूची फुले यांची पिके घेतात. तेव्हा तो परिसर अमिताभच्या ‘सिलसिला’ चित्रपटातील ‘ये कहा आ गये हम...’ ची वा ‘देखा एक ख्वाब तो...’ या गाण्यांची आठवण करून देतो.


रामदेगीला रानातून कच्च्या रस्त्याने तीन-चार किलोमीटर अंतर कापून पोचता येते. रामदेगी स्थानाविषयी निरनिराळ्या प्रकारच्या आख्यायिका आहेत. रामदेगी हे ऋषिमुनींच्या तपश्चर्येचे ठिकाण होते. त्या ठिकाणी ताडोबा नावाच्या राक्षसाची गुंफा होती असे म्हणतात. प्रभू रामचंद्राने ताडोबा या दैत्याचा पराभव करून ऋषिमुनींना संरक्षण दिले. त्या ठिकाणी रामाने शिवलिंगाची स्थापना केली म्हणून त्या ठिकाणाला ‘रामदेगी’ असे नाव पडले, म्हणे !

रामदेगीचा परिसर हा ताडोबा अभयारण्याचा भाग आहे. ते १९५५ साली निर्माण करण्यात आले. ताडोबा अभयारण्यात साग, बांबू, घावडा, बिबळा, मोह, तेंदू, खैर या प्रकारच्या वृक्षांची दाटी आढळते. अभयारण्याचे ‘ताडोबा’ हे नाव वाघाबरोबरच्या झुंजीत मरण पावलेल्या ‘तारू’ या स्थानिक आदिवासी टोळीप्रमुखाच्या नावावरून पडलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!