समाजोपयोगी नवरंग - कु. सलोनी राऊत

समाजोपयोगी नवरंग - कु. सलोनी राऊत

सचिन वाकडे, मुल

               संपूर्ण विश्व विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करुन चंद्रावर वसाहत निर्माण करण्याची तयारी करीत आहे. तर दुसरीकडे भारतात महिलांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचे वेळोवेळी प्रकर्षाने दिसून येते. भारतात व्यक्तीस्वातंत्र असले, तरी आजहि महिलांवर काहि बंधने लादलेली पहावयास मिळते. हि लादलेली बंधने झुगारुन आपापल्या आवडिचा, विविध क्षेत्रात कार्यरत असलेले रणरागीणींनी समाजात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणारे मुल तालुक्यातील युवतींविषयी पब्लिक पंचनामामध्ये खास नवरात्रनिमित्य विशेष लेखमाला प्रकाशित करण्यात येत आहे. 

               बालमनावर संस्कार करणारे केंद्र म्हणजेच शाळा. याच शाळेत आपल्या आजुबाजुला घडत असलेल्या घटनांमधून चांगले ते घ्यावे आणि वाईट ते सोडावे असा गुरुमंत्र शिकविल्या जाते. राष्ट्रपिता म. ज्योतीराव फुले यांनि सांगितलेल्या विद्येविना मती गेली .... हि शिकवण लाख मोलाची ठरते. संत, थोर महात्म्यांची, महान समाज सुधारकांची भूमी म्हणून महाराष्ट्र सुपरिचित आहे. देशाला दिशा देणारे, सदैव मार्गदर्शकांची भूमिका बजाविणाऱ्या महान विभूतीच्या महाराष्ट्रात, साहित्याला फार मोठे अनन्यसाधारण महत्व आहे. साहित्य हे केवळ माहिती देत नाहि, तर यातून आयुष्याला कलाटणी देणारी, दिशा देणारी, मार्गदर्शक ठरणारी सदैव चांगली शिकवण देणारी हि गुरुकिल्ली आहे. 
                मुल येथील तीन सदस्यांच्या आनंदी व सुखी परिवारात, कु. सलोनी अशोक राऊत या गुणी उदयोन्मुख युवा कवियत्रीचा जन्म झाला. मुल येथील कर्मवीर महाविद्यालयात शिक्षण सुरु असलेल्या सलोनीला, काव्यलेखन, लेखलेखन आणि चित्रकलेत विशेष रस आहे. 
               साहित्यक्षेत्रात काम करतांना तीला समस्या जरी आल्या नसल्या, तरी बऱ्याचदा साहित्यलेखन प्रकाशित झाल्यानंतर वाचकांचे जेव्हा फोन यायचे, तेव्हा सलोनीला असं जाणवलं की, वाचक प्रकाशित साहित्यावर न बोलता त्यांना वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची जास्ती ओढ़ असायची. आणि एकदा बोलुन झालं की, परत कहितरी कारण काढून विनाकारण फोन करायचे.
               सलोनीचे साहित्य आजपर्यंत अनेक प्रादेशिक वृत्तपत्रात जसे दै. पुण्यनगरीमध्ये २३ लेख, ४ कविता, १ बालसाहित्य तर उदयोन्मुख साहित्यप्रेमींचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या मराठीचे शिलेदार या व्हाटसअप समूहात तिच्या साहित्याला स्पेस दिली जाते. सर्वांनी दखल घ्यवी असे लिखाण ती करत असते. दिवाळी विशेषांकात 'खरा जीवनसाथी' हा लेख प्रकाशित झालेला आहे. कर्मवीर महाविद्यालयात कथा कथन स्पर्धेत प्रथम तसेच स्वरचित काव्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त असलेल्या सलोनीला यवतमाळ येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'जन्म नवा' या कवितेचे सादरिकरण करण्याची संधी प्राप्त झाली. राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सादरीकरण करणारी मुल तालुक्यातील ती पहिली व एकमेव युवा साहित्यिक ठरली आहे.
               तीला चित्रकलेत आवड असली तरी सलोनीचे पहिले प्रेम हे साहित्यावर असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. स्वलिखीत पुस्तक प्रकाशनाची मनोमन इच्छा असलेल्या सलोनीला आपल्या साहित्यातून जनजागृती करायची आहे. अजूनही काही सुशिक्षित नागरिक २१ व्या शतकातही अनिष्ठ रूढ़ी, प्रथा पाळत असल्याने त्यांना स्वत:च्या साहित्यातून शिक्षित करायचा ध्यास ती मनाशी बाळगून आहे. उदाहरण द्यायचे झाले तर, मासिक धर्माला आजही काही महाभाग विटाळ मानतात. जेव्हा की, मासिक धर्म स्त्रीयांकरिता एक अनमोल वरदान आहे. आपले विचार साहित्यातून प्रत्येक स्त्री मनावर तीला उमटवायचे आहेत. अनेक विषयावर साहित्यलेखन केलेल्या सलोनीला इतर विषयाच्या तुलनेत 'प्रेम' या विषयावर वाचकांचा अधिक प्रतिसाद मिळतो.
           
   साहित्य क्षेत्रातील पदार्पणातच ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'जन्म नवा' या कवितेचे सादरिकरण करण्याची संधी मिळालेल्या सलोनीसारख्या नवोदित साहित्यिकाला, आपले स्वत:चे वेगळेपण जपणारे नाव तसेच स्वत:चे अस्तित्व असावे, असे वाटत असते. आणी तसे वाटण्यात काहि गैर नाहि. तीने निवडलेला मार्ग मोठा व खडतर असला, तरी त्यावर चालायची मनोमन तयारी केलेल्या सलोनीला पब्लिक पंचनामाकडून मनपुर्वक शुभेच्छा ...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!