रामाळा ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगाच्या कामावर बोगस मजूर
रामाळा ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगाच्या कामावर बोगस मजूर
रोजगार सेवक साईनाथ शेंडे यांच्यावर कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी
सुनील घाटे सिंदेवाही प्रतिनिधी :-
सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या रामाळा या गट ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या मनरेगाच्या कामात बोगस मजूर लावले असून रोजगार सेवक साईनाथ शेंडे यांनी याद्वारे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करून रोजगार सेवक यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करीत गावातील 250 नागरिकांनी आपल्या स्वाक्षरीचे निवेदन गटविकास अधिकारी यांना दाखल केलेले आहे.
रामाळा ही गटग्रामपंचायत असून यामध्ये आंबोली हे गाव समाविष्ट केलेले आहे मागील अनेक वर्षापासून या ग्रामपंचायत मार्फत मनरेगा योजनेतून अनेक कामे करण्यात आली. यामध्ये रामाळा ते मिनघरी रस्त्याला दुतर्फा वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, पवन बोरी मामा तलावाचे गाळ काढणे, शौचालय बांधकाम, इत्यादी कामे करण्यास आली. सदर कामावर मजुरांना लावणे व त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी रोजगार सेवक म्हणून साईनाथ शेंडे हे मागील पंधरा वर्षांपासून काम पाहत आहेत. परंतु रोजगार सेवक साईनाथ यांनी वरील कामावर बोगस मजूर दाखवून त्यांची नावाने मजूर मस्टर तयार केले व पैशाचा गैरप्रकार केलेला आहे. 2010 ते 2020 पर्यंत झालेल्या मनरेगाच्या कामावर स्वतःची पत्नी सरिता शेंडे हिचे वारंवार मस्टर तयार करून लाखो रुपये हडप केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. आजपर्यंत जे मजूर मास्टर तयार केले आहे, यामध्ये लता रमेश शेंडे, कुसुम तुकाराम उईके, कुसुम मधुकर तिरमारे, व इतर अनेक बोगस मजूर दाखवून पैशाची उचल केली आहे. तसेच पवन बोरी मामा तलावाच्या कामावर पुष्पा हिरामण पेटकुले व इतर बोगस मजूर दाखवून पैसे हडप केलेले आहे. साईनाथ शेंडे हे मागील अनेक वर्षापासून ग्रामपंचायत रामाळा अंतर्गत रोजगार सेवक म्हणून काम पाहत आहेत मात्र मागील पंधरा वर्षात त्यांनी हजारो बोगस मजूर दाखवून लाखो रूपयाचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप रामाळा आणि आंबोली ग्रामवासी यांनी केला असून या गंभीर प्रकाराची तक्रार गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे रोजगार सेवक साईनाथ शेंडे यांची योग्य चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करीत गावकरी यांनी पुढाकार घेऊन अनेकांच्या स्वाक्षरीचे निवेदन दिलेले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!