दिवाळीत मूल शहर कचऱ्याच्या विळख्यात!

दिवाळीत मूल शहर कचऱ्याच्या विळख्यात!

सफाई कामगारांचा बोनससाठी संप; तीन दिवसांपासून स्वच्छता ठप्प, ब्रेकरवरील रेतीमुळे अपघातांचा धोका!

मूल | प्रतिनिधी

बोनसच्या आश्वासनाची पूर्तता नाही

दिवाळी म्हणजे स्वच्छता, प्रकाश आणि मांगल्याचा सण! मात्र याच सणाच्या दिवसांत मूल शहरात अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले आहे. दिवाळी बोनस देण्याचे आश्वासन पूर्ण न झाल्याने सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. शनिवारपासून शहरातील साफसफाई ठप्प झाली असून बाजारपेठेसह विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. सणासुदीच्या काळात नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.

कामगारांच्या मागणीकडे लक्ष कधी?

सफाई कामगारांना दिवाळी बोनस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आश्वासनाप्रमाणे बोनस न मिळाल्याने कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. दिवाळीच्या तोंडावर हक्काचा बोनस मिळावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी असताना प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुरांच्या बोनसचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने स्वच्छता व्यवस्था विस्कळीत झाली आहे.

ब्रेकरवर रेती; अपघातांचा धोका!

शहरातील स्वच्छतेसोबतच रस्ते सुरक्षेचाही प्रश्न गंभीर बनला आहे. मूल शहरातील ब्रेकरवर मागील तीन दिवसांपासून रेती पडून असल्याची माहिती आहे. या रेतीमुळे दुचाकी घसरून अनेक अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दिवाळीच्या काळात बाजारपेठेत नागरिकांची मोठी वर्दळ असताना रस्त्यावरील रेती हटविण्याची खबरदारी का घेतली जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

नगरपरिषदेत चर्चा; तोडगा अद्याप प्रतीक्षेत

सफाई कामगारांच्या बोनसच्या मागणीवरून नगरपरिषदेत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. मात्र या चर्चेतून काय निष्पन्न झाले, बोनस कधी मिळणार आणि शहरातील साफसफाई पुन्हा कधी सुरू होणार, याबाबत अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. नगरसेवक आणि सत्ताधाऱ्यांकडूनही या प्रश्नावर ठोस पुढाकार दिसत नसल्याची नागरिकांची भावना आहे.

मुख्याधिकारी संदीप दोडे यांच्याकडून या प्रश्नावर अधिकृत स्पष्टीकरण अपेक्षित आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याऐवजी खरेदीच्या विषयांना अधिक प्राधान्य दिले जात असल्याची टीका होत आहे.

दिवाळीत नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित शहर देणे ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे. कामगारांच्या बोनसचा प्रश्न सोडवून स्वच्छता व्यवस्था पूर्ववत करणे आणि ब्रेकरवरील रेती तातडीने हटविणे आवश्यक आहे. कामगारांचा बोनसचा प्रश्न आणि नागरिकांची स्वच्छतेसाठी सुरू असलेली प्रतीक्षा यावर नगरपरिषद प्रशासन तोडगा कधी काढणार? दिवाळीत तरी प्रशासनाला जाग येणार का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!