दिवाळीच्या आनंदोत्सवावर शोककळा! अर्जुनी येथे ४० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

दारूचे व्यसन आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे मानसिक तणावात असल्याची माहिती; शेगाव पोलिसांकडून तपास सुरू

तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - दिवाळीच्या सणाचा आनंद सर्वत्र साजरा होत असतानाच शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अर्जुनी येथे एका ४० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. विठोबा मारोती दडमल (वय ४०, रा. अर्जुनी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, विठोबा दडमल हे मागील काही दिवसांपासून कौटुंबिक परिस्थिती आणि दारूच्या व्यसनामुळे मानसिक तणावात असल्याची माहिती आहे. पत्नी जवळ राहत नसल्याने ते अस्वस्थ राहत असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, आत्महत्येच्या घटनेच्या एक दिवस आधीही त्यांनी दोरीच्या साहाय्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी गावकऱ्यांनी तसेच शेगाव पोलिसांनी त्यांची समजूत काढून त्यांना असे टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी प्रयत्न केले होते.

मात्र, दिवाळीच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास त्यांनी दारूच्या नशेत राहत्या घरातील छताच्या लाकडी आड्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविले. घटनेची माहिती मिळताच शेगाव बुद्रुक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे पाठविला.

मृत विठोबा दडमल यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणादिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे अर्जुनी परिसरात शोककळा पसरली आहे.

या घटनेचा पुढील तपास शेगाव बुद्रुक पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!