भाजपचे चिमूर मंडळ अध्यक्ष गजानन गुळधे यांच्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल!

आमदार बंटी भांगडिया यांचे निकटवर्तीय असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ; आरोपी फरार, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू – अटकेच्या मागणीसाठी तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चिमूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी गंभीर घटना समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीचे चिमूर मंडळ अध्यक्ष तथा आदर्श सातारा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गजानन धनराज गुळधे यांच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी चिमूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गजानन गुळधे हे चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने या प्रकरणाला राजकीय वर्तुळातही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, गजानन धनराज गुळधे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(अ) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची नोंद चिमूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरू आहे.
यासंदर्भात चिमूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांनी माहिती देताना सांगितले की, संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास आणि आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

राजकीय जवळीक चर्चेचा विषय

गजानन गुळधे हे सातारा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून, भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक राजकारणातही सक्रिय आहेत. आदर्श ग्रामपंचायत म्हणून गौरविण्यात आलेल्या सातारा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाल्याची पार्श्वभूमीही चर्चेत आहे. सध्या ते भाजपचे चिमूर मंडळ अध्यक्ष असल्याने या प्रकरणामुळे स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख असल्याने या प्रकरणाकडे नागरिकांचे आणि राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष तपास व्हावा आणि पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे.

आरोपीच्या अटकेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार – शिवानी वडेट्टीवार

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ चिमूर तालुका काँग्रेस आणि युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. आरोपीला तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चिमूर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
युवक काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, अल्पवयीन मुलीशी संबंधित हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. अशा संवेदनशील प्रकरणात पोलिसांनी कोणताही राजकीय दबाव न घेता तातडीने कारवाई करावी. आरोपीला अटक होऊन पीडितेला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस आणि युवक काँग्रेसचे पोलीस ठाण्यातील ठिय्या आंदोलन सुरूच राहणार आहे.

अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अल्पवयीन मुलीशी संबंधित लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप आणि त्यानंतर आरोपी फरार असल्याची माहिती समोर आल्याने चिमूर तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकरणांमध्ये पीडितेची ओळख गोपनीय ठेवणे, तिचे संरक्षण करणे आणि तपासाची प्रक्रिया संवेदनशीलतेने पार पाडणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे.
आता या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीला कधी अटक केली जाते, तपासात आणखी कोणती तथ्ये समोर येतात आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे संपूर्ण चिमूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

गुन्हा दाखल; आरोपी फरार; काँग्रेसचे ठिय्या आंदोलन सुरू! आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!