फटाक्यांचा त्याग, पर्यावरणाचा जागर! निष्टीच्या विद्यार्थ्यांचा प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प

जि.प. उच्च प्राथमिक शाळा निष्टी येथे पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम; विद्यार्थ्यांनी घेतली सामूहिक शपथ

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दिवाळी हा आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण असला, तरी या सणाच्या आनंदात पर्यावरणाची हानी होऊ नये, याची जाणीव ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हाच सामाजिक आणि पर्यावरणपूरक संदेश देत निष्टी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला. विद्यार्थ्यांना यावेळी पर्यावरण संवर्धनाची शपथ देऊन फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना फटाक्यांमुळे निर्माण होणारे हवेचे व ध्वनीचे प्रदूषण, तसेच त्याचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दिवाळीचा आनंद साजरा करताना निसर्गाची हानी टाळणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.

पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी प्लास्टिकमुक्त सजावट करणे, मातीच्या पणत्यांचा वापर करणे, नैसर्गिक रंगांपासून आकर्षक रांगोळी काढणे, तसेच भेटवस्तू म्हणून रोपांचे वाटप करणे अशा विविध संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आल्या. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच निसर्गाशी मैत्री करण्याचा संदेश देण्यात आला.

हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. अंकुश कामडी सर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी पदवीधर शिक्षक श्री. श्रीकृष्ण हाडगे सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ. लीना काटेखाये मॅडम, सहशिक्षक श्री. सत्यवान बावनगडे सर, शिक्षण सेविका सौ. रूपाली वांढरे मॅडम आणि सौ. अर्चना आरसोडे मॅडम यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

दिवाळीचा खरा प्रकाश केवळ आकाशात फटाके फोडण्यात नसून, निसर्गाचे सौंदर्य जपण्यात आणि समाजाच्या आरोग्याची काळजी घेण्यात आहे, हा मोलाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त, प्लास्टिकमुक्त आणि निसर्गस्नेही दिवाळी साजरी करण्याचा निर्धार व्यक्त केला. शाळेच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यास निश्चितच मदत होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!