विहिरीत पडलेल्या सहा फुटी अजगराला जीवदान; वनविभागाच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात मुक्त!
पर्यावरणप्रेमी जगदीश पेंदाम यांच्या एक तासाच्या अथक प्रयत्नांना यश; ताडोबातील पंचधारा येथे अजगराला सुरक्षित सोडले
तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - भद्रावती तालुक्यातील आष्टा गावालगत असलेल्या शेतातील विहिरीत पडलेल्या सुमारे सहा फूट लांबीच्या अजगराला जीवदान देण्यात यश आले. पर्यावरणप्रेमी जगदीश पेंदाम यांनी तब्बल एक तास अथक प्रयत्न करून या अजगराला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याला ताडोबा येथील पंचधारा परिसरातील नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ताडोबा परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या भद्रावती तालुक्यातील आष्टा गावातील प्रकाश नगराळे यांच्या शेतातील विहिरीत साप पडल्याची माहिती क्षेत्र सहाय्यक कामटकर यांनी पर्यावरणप्रेमी जगदीश पेंदाम यांना दिली. माहिती मिळताच त्यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली.
विहिरीत पाहणी केली असता सुमारे सहा फूट लांबीचा अजगर असल्याचे निदर्शनास आले. मोठ्या काळजीपूर्वक आणि कौशल्याने त्यांनी जवळपास एक तास प्रयत्न करून अजगराला विहिरीबाहेर काढले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अजगराला ताडोबा येथील पंचधारा परिसरात त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.
या बचाव मोहिमेदरम्यान क्षेत्र सहाय्यक सोनेगाव येथील कामटकर साहेब, वनरक्षक ताडोबा जुडे, सोनेगावच्या वनरक्षक राजगडे मॅडम, वनरक्षक तामशी येथील वघारे साहेब, कुटी मजूर सुधाकर चौखे, गोरख कोकुडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, विहिरीतून अजगराला बाहेर काढण्याची माहिती गावात पसरताच हा दुर्मीळ प्रसंग पाहण्यासाठी नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती. वन्यजीव संरक्षण आणि सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे एका वन्यजीवाला नवजीवन मिळाले असून, पर्यावरणप्रेमी जगदीश पेंदाम यांच्या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.
वन्यजीवांचे संरक्षण ही केवळ वनविभागाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, याची जाणीव या घटनेतून पुन्हा एकदा झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!