निष्टी शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाली दिवाळीची झळाळी!
पणत्या रंगविणे, आकाशकंदील निर्मिती, रांगोळी अन् ग्रीटिंग कार्ड्सद्वारे विद्यार्थ्यांनी फुलविली सर्जनशीलता
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - पवनी तालुक्यातील जि.प. पूर्व माध्यमिक शाळा, निष्टी येथे 'कला व कार्यानुभव' या विषयांतर्गत दिवाळीनिमित्त विशेष उपक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांच्यात सृजनशीलता विकसित करणे तसेच श्रमसंस्कृतीचे महत्त्व रुजविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवित आपल्या कल्पकतेला आणि कलाकौशल्याला सुंदर कलाकृतींच्या माध्यमातून अभिव्यक्त केले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी आकर्षक पणत्या रंगविल्या, विविध प्रकारचे आकाशकंदील तयार केले, मनमोहक रांगोळीच्या रचना साकारल्या. तसेच पर्यावरणपूरक सजावटीचे साहित्य आणि रंगीबेरंगी शुभेच्छापत्रे (ग्रीटिंग कार्ड्स) तयार करून आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.
पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि त्यांच्यामध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण होते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीने तयार केलेल्या आकर्षक कलाकृतींनी शाळेचे वातावरण दिवाळीच्या रंगात न्हाऊन निघाले.
विद्यार्थ्यांच्या या कलाकृती पाहून उपस्थित शिक्षक व पालकांनी त्यांचे मनापासून कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढण्यासोबतच त्यांना स्वतःमधील कलागुण ओळखण्याची संधी मिळते. शिक्षणासोबत कला, कौशल्य आणि श्रमप्रतिष्ठेची जोड देणारा हा दिवाळी उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!