न्यायाधीशांचे शासकीय निवासस्थानही चोरांच्या निशाण्यावर!

लोखंडी गेटचे कुलूप तोडून सहा हजारांची विद्युत वायरिंग लंपास; पोलिसांच्या गस्त व सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा शहरात आता न्यायिक अधिकाऱ्यांचे शासकीय निवासस्थानही चोरांपासून सुरक्षित नसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांच्या शासकीय निवासस्थानाचे लोखंडी गेट तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील विद्युत वायरिंग चोरून नेली. चोरी झालेल्या साहित्याची किंमत अंदाजे सहा हजार रुपये असून, या घटनेमुळे शहरातील पोलीस गस्त आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित शासकीय निवासस्थान १० जुलैपासून रिकामे होते. दरम्यान, ७ नोव्हेंबर रोजी न्यायिक अधिकाऱ्यांना निवासस्थानासमोरील गेट उघडे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पाठविले. पाहणीदरम्यान लोखंडी गेटचे कुलूप तोडलेले आढळून आले. तसेच घरातील खोल्यांमधील विद्युत वायरिंग उखडून नेल्याचे निदर्शनास आले.

रिकामे आणि सुनसान असलेले शासकीय निवासस्थान चोरट्यांनी लक्ष्य करून चोरीची घटना घडविल्याचे प्राथमिक स्वरूपावरून दिसून येते. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

न्यायिक अधिकाऱ्यांचे निवासस्थानच सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची हमी कोण देणार? असा सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, चोरीची रक्कम अवघी सहा हजार रुपये असली तरी न्यायव्यवस्थेशी संबंधित अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानात चोरी होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून शासकीय इमारती व रिकाम्या निवासस्थानांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!