गोसेखुर्दचे पाणी शेतीला इंजिनद्वारे घेण्यास अडवू नका - आमदार वडेट्टीवार यांचे विभागाला निर्देश
गोसेखुर्दचे पाणी शेतीला इंजिनद्वारे घेण्यास अडवू नका - आमदार वडेट्टीवार यांचे विभागाला निर्देश
सावली - सावली तालुक्याला दुष्काळसदृश परिस्थितीतही गोसेखुर्द पाण्याने तारले आहे. मात्र गोसेखुर्द नहराच्या काठावर उंचावर असलेल्या ठिकाणी कापूस व धान पिकांना पाण्याची गरज आहे. मात्र विभागाच्या अधिकाऱ्यांकडून इंजिनद्वारे पाणी घेण्यास अडवणूक केल्या जात असल्याची बाब शेतकऱ्यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांचे लक्षात आणून दिले. अशा परिस्थितीत गोसेखुर्द धरणाचे पाणी शेतीसाठी इंजिनद्वारे घेण्यास शेतकऱ्यांना अडवू नये, असे स्पष्ट निर्देश ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी गोसेखुर्द विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
पावसाने ओढ दिल्याने गोसेखुर्द लाभक्षेत्रात नसलेले शेतकरी संकटात सापडले आहेत. कापूस, धान पिके फुलोऱ्यावर असून पिके सुकत आहेत ही पिके वाचविण्यासाठी शेतकरी गोसेखुर्दच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, इंजिनद्वारे पाणी घेण्यास अडथळे निर्माण झाल्यास पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी घेण्यास अनावश्यक अडवणूक करू नये, असे गोसेखुर्दचे कार्यकारी अभियंता गायकवाड यांना निर्देश दिले. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि पिकांचे नुकसान टाळता यावे, यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शेतकऱ्यांनी गोसेखुर्द नहराचे पाणी इंजिनद्वारे घेऊन आपली पिके वाचवावी असे आवाहन ब्रम्हपुरी क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!