वाठोड्यात एलसीबीचा अवैध देशी दारू साठ्यावर छापा!
एक लाख रुपये किमतीच्या २,५०० सिलबंद बाटल्या जप्त; अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या वाठोडा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध देशी दारूच्या साठ्यावर छापा टाकून एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ‘रॉकेट संत्रा’ देशी दारूच्या २,५०० सिलबंद प्लास्टिक बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. अवैध दारूविक्रीविरोधात झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची धडक कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सर्वेश श्रीकृष्ण बेलसरे हे पोलीस पथकासह १६ ऑक्टोबर २०२६ रोजी चंद्रपूर-वरोरा-चिमूर विभागात अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. याचदरम्यान गोपनीय माहितीदाराकडून वाठोडा येथील प्रशांत उर्फ परशु आत्राम याच्या घरालगत असलेल्या खोलीत मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा लपवून ठेवल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी घरासमोर निखील शेखर जोंगोनी (वय २३, रा. खांबाडा) आणि प्रविण मारोतराव सुरसे (वय ३२, रा. बारव्हा), दोघेही तालुका वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी, संशयास्पद स्थितीत आढळून आले.
खोलीत आढळल्या २५ खोक्यांमध्ये दारूच्या बाटल्या
पोलिसांनी संबंधितांकडे चौकशी केली असता, प्रशांत उर्फ परशु आत्राम याच्या घरालगतच्या खोलीत तिघांनी मिळून देशी दारूचा साठा ठेवल्याचे त्यांनी सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. प्रशांत आत्राम हा कामानिमित्त बाहेर गेला असून आपण दारूच्या साठ्याची देखरेख करीत असल्याचेही त्यांनी सांगितल्याचे नमूद आहे.
त्यानंतर पोलिसांनी संबंधित खोलीची झडती घेतली असता, २५ खोक्यांमध्ये प्रत्येकी ९० मिलिलिटर क्षमतेच्या १०० बाटल्या, अशा एकूण २,५०० ‘रॉकेट संत्रा’ देशी दारूच्या सिलबंद बाटल्या आढळून आल्या. या साठ्याची एकूण किंमत एक लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
दारू बाळगण्यासाठी आवश्यक परवाना नसल्याचे संबंधितांनी पंचांसमक्ष कबूल केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जप्त केलेल्या दारूच्या नमुन्यापैकी एक बाटली रासायनिक विश्लेषणासाठी स्वतंत्र ठेवून सीलबंद करण्यात आली.
महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सर्वेश श्रीकृष्ण बेलसरे यांच्या फिर्यादीवरून शेगाव पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहेत.
अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई सुरू
वाठोडा येथील या कारवाईत मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा जप्त झाल्याने परिसरातील अवैध दारूविक्रीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. अवैध दारूची साठवणूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अशाच प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहणे आवश्यक असल्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!