घोडाझरी कालव्याचे पाणी सुरू; शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश! धान पिकासाठी पाणी सोडण्याची मागणी; शेतकऱ्यांचे तलावावर ठिय्या आंदोलन,
तळोधी (बा.): प्रतिनिधी
नागभीड तालुक्यातील घोडाझरी कालव्याचे पाणी बंद करण्यात आल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत घोडाझरी तलावावर ठिय्या आंदोलन केले. धान पिकाला वाचविण्यासाठी तातडीने पाणी सोडण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी ‘पाणी द्या हो… पाणी द्या!’ अशी आर्त हाक दिली. अखेर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता घोडाझरी कालव्यातून धान पिकासाठी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, रविवार, दि. १८ ऑक्टोबर रात्री १० वाजताच्या सुमारास घोडाझरी तलावाच्या कालव्याचे पाणी बंद करण्यात आले. सध्या धान पीक महत्त्वाच्या टप्प्यावर असताना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कालव्याचे पाणी बंद झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे मोठे संकट उभे ठाकले. एका पाण्याअभावी हातातोंडाशी आलेले धान पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत होती.
यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी धान पिकाच्या लागवडीपासून ते पिकाच्या जोपासनेपर्यंत मोठी मेहनत घेतली. बी-बियाणे, खते, कीटकनाशकांची फवारणी आणि मजुरीवर मोठा खर्च केला. मात्र, आता पीक परिपक्वतेच्या टप्प्यावर असताना पाण्याअभावी उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे कालव्याचे पाणी तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी घोडाझरी तलावावर ठिय्या आंदोलन केले.
धान पिकाला पाणी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. पाण्याअभावी पिकांचे नुकसान झाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सोसावी लागणार असल्याने आंदोलनस्थळी संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी छगन कोलते यांनी जलसमाधी घेण्याचा इशाराही दिला. तर विनोद बोरकर, खोजराम मरसकोल्हे, दिनेश नागोसे, गणेश ठाकरे असा शेकडो शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा आणि पाणी सोडण्याच्या मागणीची तीव्रता लक्षात घेता संबंधित यंत्रणेने अखेर कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेत सायंकाळी ४ वाजता पाणी सोडण्यात आल्याने आंदोलनाला यश मिळाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
घोडाझरी कालव्याचे पाणी दुष्काळी परिस्थितीमुळे बंद करण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, धान पिकाच्या ऐन गरजेच्या काळात पाणी बंद झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे पिकांची गरज आणि उपलब्ध पाणीसाठा यांचा समतोल साधून सिंचनाचे नियोजन करावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
घोडाझरी कालव्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर अखेर पाणी सोडण्यात आले असले, तरी भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये, यासाठी सिंचन विभागाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!