वरोऱ्याच्या सुरेश पोतराजे यांना ‘बेस्ट फार्मर ऑफ द इयर’ पुरस्कार!

७० एकरांत ८५० क्विंटल कापूस उत्पादनाचा दावा; आधुनिक लागवड पद्धतीचा अवलंब पारस ॲग्रोचे संचालक अमोल मुथा यांचे कापूस लागवड व आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील पोहा येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश शंकर पोतराजे यांना कापूस उत्पादनातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘बेस्ट फार्मर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागपूर येथे पार पडलेल्या Indian Cotton Committee 2026 या कार्यक्रमात विदर्भ कॉटन असोसिएशनच्या वतीने २०२५-२६ या वर्षासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विदर्भातील एकूण तीन शेतकऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

सुरेश पोतराजे यांनी ७० एकर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली असून, आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनवाढीचा प्रयत्न केला. त्यांनी पारंपरिक पद्धतीऐवजी तीन बाय एक फूट अंतरावर बेडवर कपाशीची लागवड केली. तसेच रासायनिक खतांचा मर्यादित वापर करून उत्पादन खर्च कमी करण्यावर भर दिला. वेदा सीड्स कंपनीच्या ‘प्लॅटिनम’ या वाणाची निवड करून त्यांनी कापूस उत्पादनात यश मिळविले.

पोतराजे यांची शेती वरोरा तालुक्यातील सात ते आठ वेगवेगळ्या ठिकाणी असून, त्यांनी ही जमीन भाडेतत्त्वावर घेतली आहे. विविध ठिकाणी शेती करताना योग्य वाणाची निवड, सुधारित लागवड पद्धती आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन यांचा त्यांनी अवलंब केला. या कामात कृषी मंडळ अधिकारी विजय काळे आणि अमोल मुथा यांचे मार्गदर्शन लाभले.


आधुनिक कापूस शेतीबाबत मार्गदर्शन
नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात पारस ॲग्रोचे संचालक अमोल मुथा यांनी शेतकऱ्यांना आधुनिक कापूस लागवड पद्धती आणि तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित वाणांची निवड, आधुनिक लागवड तंत्रज्ञान आणि रासायनिक खतांचा मर्यादित वापर या बाबींवर त्यांनी भर दिला. अशा मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींची माहिती मिळून उत्पादन खर्च कमी करण्यास आणि उत्पादकता वाढविण्यास मदत होऊ शकते.

पारस जिनिंगमध्ये पुरस्काराचे वितरण

नागपूर येथे आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमाला सुरेश पोतराजे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे वरोरा येथे पारस जिनिंगमध्ये छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुरुदेव भक्त लक्ष्मण गमे, रुपालजी कावळे, पारस ॲग्रोचे संचालक अमोल मुथा तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या वतीने हा पुरस्कार वितरित करण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, बांधकाम सभापती नितीन मते, दत्ता बोरेकर , विनोदजी बाफना यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून कापूस उत्पादनात प्रगती साधणाऱ्या सुरेश पोतराजे यांचा या पुरस्कारामुळे गौरव झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!