सावलीतील खादी ग्रामोद्योग केंद्राची दुरवस्था; पुनरुज्जीवनाची मागणी

 

सावलीतील खादी ग्रामोद्योग केंद्राची दुरवस्था; पुनरुज्जीवनाची मागणी

सावली : महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या सावली येथील नागविदर्भ खादी ग्रामोद्योग केंद्राची सध्या दुरवस्था झाली आहे. एकेकाळी शेकडो मजुरांना रोजगार देणारे आणि स्वदेशी उद्योगाचे प्रतीक असलेले हे केंद्र आज शासनाच्या दुर्लक्षामुळे बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. केंद्राच्या इमारती जीर्ण झाल्या असून काही ठिकाणी पडझड झाली आहे. विणकाम बंद असल्याने या उद्योगावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

        सावली येथील या खादी ग्रामोद्योग केंद्राला महात्मा गांधी यांनी तीन वेळा भेट दिल्याचे सांगितले जाते. तसेच ६ फेब्रुवारी ते २९ मार्च १९३६ या कालावधीत येथे गांधी सेवा संघाचे दुसरे अधिवेशन पार पडले होते. त्यामुळे या केंद्राला सावलीच्या सामाजिक, औद्योगिक आणि ऐतिहासिक वारशात महत्त्वाचे स्थान आहे. 

👪 ६०० मजुरांना मिळत होता रोजगार

एकेकाळी या केंद्रात सुमारे ६०० मजूर सूतकाम, विणकामासह विविध कामांमध्ये कार्यरत होते. येथे धोतर, साड्या, तेल, चप्पल यांसह विविध वस्तूंची निर्मिती केली जात होती. खादी ग्रामोद्योगामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले होते. मात्र कालांतराने देखभालीचा अभाव, उद्योगाला आवश्यक पाठबळ न मिळणे आणि व्यवस्थापनाच्या समस्यांमुळे केंद्राची स्थिती खालावत गेली. सध्या फक्त सुतकताईचे काम सुरु असून अनेकदा पगार वेळेवर मिळत नसल्याने रोजगारात खंड निर्माण होतो. विणकामाची कामे बंद असल्याने एकेकाळी गजबजलेल्या परिसरात शांतता पसरली आहे.

    🏠 जीर्ण इमारती ऐतिहासिक वारशाची साक्ष

 खादी ग्रामोद्योगाच्या इमारतींची अवस्था चिंताजनक झाली असून काही भाग जीर्ण झाल्याचे दिसून येते. बंद पडलेले हातमाग आणि वापराविना पडलेली साधनसामग्री या केंद्राच्या गतवैभवाची आठवण करून देतात. गांधीजींच्या विचारांशी आणि स्वदेशी चळवळीशी जोडलेल्या या ऐतिहासिक स्थळाच्या संवर्धनाचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आला आहे.

👚पुनरुज्जीवनाची मागणी

खादी ग्रामोद्योग केंद्राची तातडीने पाहणी करून जीर्ण इमारतींची दुरुस्ती, आवश्यक यंत्रसामग्रीची उपलब्धता आणि सुतकताई-विणकाम पुन्हा सुरू करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

        केंद्राचे पुनरुज्जीवन झाल्यास स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच सावलीचा ऐतिहासिक वारसाही जतन होऊ शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून या केंद्राच्या पुनरुज्जीवनासाठी ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सावलीवासीयांकडून व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!