दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पवनीत मदतीचा हात!
दोन तासांच्या मदत संकलन अभियानातून ₹9,600 जमा; मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम जमा
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश झाल्यानंतर संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेण्यात आला. विदर्भ युवा क्रांती संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जनतेतून मदत संकलन अभियान राबविण्यात आले.
या अभियानाची संकल्पना विदर्भ युवा क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक सिंग टाक यांच्या संकल्पनेतून पुढे आली. विदर्भ युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष हर्षल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष घनश्याम वंजारी यांच्या नेतृत्वात हे अभियान पार पडले.
अवघ्या दोन तासांच्या कालावधीत जनतेतून ₹3,600 इतकी मदत जमा झाली. विशेष म्हणजे, अभियानाला प्रतिसाद देत संघटना व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून आणखी ₹6,000 मदत जमा केली. त्यामुळे एकूण ₹9,600 इतकी रक्कम संकलित झाली.
संकलित झालेली मदत पवनी तालुक्यातीलच योग्य व गरजू दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ती तहसीलदार पवनी यांच्याकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, तहसीलदारांनी सदर रक्कम स्वीकारण्याची जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने, संकलित झालेली एकूण ₹9,600 रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आली. मुख्यमंत्री सहायता निधी हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत निधी असून त्याचा उद्देश आपत्कालीन परिस्थितीत गरजू व्यक्तींना मदत उपलब्ध करून देणे हा आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही माणुसकीचा हात
या मदत अभियानादरम्यान प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्गानेही संवेदनशीलता दाखवत अभियानाला सहकार्य केले. दुष्काळग्रस्तांसाठी अधिकारी-कर्मचारी वर्गाने यापूर्वीच आपापला एक दिवसाचा पगार मदत म्हणून दिलेला असतानाही, या अभियानाला प्रतिसाद देत त्यांनी आपल्या परीने सहकार्य केले.
या माध्यमातून प्रशासन, सामाजिक संघटना आणि राजकीय कार्यकर्ते एकत्र येऊन संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू शकतात, असा सामाजिक संदेश या अभियानातून देण्यात आला.
या कार्यकर्त्यांची महत्त्वाची भूमिका
अभियान यशस्वी करण्यासाठी विदर्भ युवा क्रांती संघटनेचे शहराध्यक्ष रणवीर सिंग बावरी, आर्यन शेंडे, दिशांत सोनवणे, अनिकेत शेंडे, उज्वल राऊत आणि अविनाश खोब्रागडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
“शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, तर आपल्या संपूर्ण समाजाचा आधार आहे. संकटाच्या काळात त्याच्या पाठीशी उभे राहणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे,” अशी भावना या अभियानाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली.
दुष्काळग्रस्त पवनी तालुक्यात शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘संकटाच्या काळात मदतीसाठी हात पुढे करा’ हा संदेश देण्यात आला असून, जनतेच्या सहभागातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!