वाघाच्या हल्ल्यात महिला शेतकरी थोडक्यात बचावली!
- खातोडा शेतशिवारातील घटना; धान पिकावर औषध फवारणी दरम्यान हल्ला
- आरडाओरड केल्याने वाघाने ठोकली धूम; चिमूर रुग्णालयात उपचार सुरू
प्रतिनिधी - शुभम बारसागडे
चिमुर /नेरी : - नेरी परिसरातील तपोभूमी गोंदेडा लगत असलेल्या खातोडा येथील शेतशिवारात रविवार, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास थरारक घटना घडली. शेतात विश्रांती घेत असलेल्या एका महिला शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. मात्र, प्रसंगावधान राखून महिलेने आणि तिच्या पतीने केलेल्या आरडाओरड्यामुळे वाघाने घटनास्थळावरून पळ काढला, आणि महिलेचा थोडक्यात जीव वाचला.
साधना मधुकर जांभूळे (वय ४५, रा. खातोडा) असे जखमी महिला शेतकऱ्याचे नाव आहे.
काय आहे नेमकी घटना?
प्राप्त माहितीनुसार, साधना जांभूळे या आपले पती यांच्यासह खातोडा शेतशिवारात धान पिकावर औषध फवारणी करण्यासाठी गेल्या होत्या. पती शेतात फवारणीचे काम करत असताना, साधना या काही वेळ विश्रांतीसाठी शेताच्या बांधावर झोपल्या होत्या. यादरम्यान, परिसरामध्ये दबा धरून बसलेला वाघ अत्यंत सावधपणे त्यांच्या जवळ येऊन पोहोचला. झोपलेल्या महिलेच्या हालचालींमुळे वाघाने आपल्या पंजाने त्यांना हलवून पलटवण्याचा प्रयत्न केला.
अचानक झालेल्या या थरारक प्रकारामुळे साधना जांभूळे यांना जाग आली. डोळे उघडून पाहताच समोर भलामोठा वाघ दिसल्याने त्यांची भीतीने अक्षरशः भंबेरी उडाली. परंतु, अशा बिकट आणि अत्यंत धाकधुकीच्या परिस्थितीतही त्यांनी प्रचंड धाडस दाखवत अत्यंत जोरात आरडाओरड सुरू केली. पत्नीचा आवाज ऐकून त्यांचे पती तातडीने धावत घटनास्थळी आले. दोघा पती-पत्नीने मिळून एकच आरडाओरड केल्यामुळे घाबरलेल्या वाघाने तेवढ्यात तिथून धूम ठोकली.
या झटापटीत आणि वाघाच्या पंजाच्या नखांमुळे साधना जांभूळे यांच्या हाताला किरकोळ जखमा झाल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे नेरी क्षेत्र सहाय्यक अधिकारी तोंडासे, वनरक्षक आळणे आणि वनरक्षक संभाजी वडझे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमी महिलेला तात्काळ उपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
सध्या धान पिकाचा हंगाम जोमात सुरू असल्यामुळे शेतकरी व शेतमजूर मोठ्या संख्येने आपल्या शेतात कामासाठी जात आहेत. अशातच दिवसाढवळ्या वाघाने महिला शेतकऱ्यावर हल्ला केल्यामुळे खातोडा व परिसरातील शेतकरी वर्गात तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने या परिसरातील वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी संतप्त नागरिकांमधून व शेतकऱ्यांकडून होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!