मैत्रीच्या नात्याने कर्तृत्वाचा सन्मान; मित्र परिवाराच्या स्नेहमिलनात मान्यवरांचा गौरव..!!
मैत्रीच्या ऋणानुबंधातून कर्तृत्वाचा सन्मान; संघर्षातून मिळवलेल्या यशाला मित्र परिवाराची मनापासून दाद.
नागभीड : मैत्रीचे नाते हे केवळ सुख-दुःखात साथ देणारे नसते, तर मित्राच्या कर्तृत्वात स्वतःचा आनंद शोधणारे असते. याच मैत्रीच्या ऋणानुबंधातून मित्र परिवार, नागभीड यांच्या वतीने स्नेहमिलन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या वेळी मित्र परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.
SNB सेलिब्रेशन हॅाल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठाचा जीवन साधना पुरस्कार २०२६ प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन जयस्वाल, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मानद सचिव व नगरसेवक अवेश पठाण आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, नागभीडचे नवनियुक्त सभापती गणेश तर्वेकर हे सत्कारमूर्ती म्हणून मंचावर उपस्थित होते. भारत मातेला वंदन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाला सुरेल प्रारंभ झाला. मान्यवरांचे सन्मानवस्त्र व श्रीमद्भगवद्गीता देऊन स्वागत करण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानवस्त्र, नावीन्यपूर्ण बुके व श्रीफळ देऊन सत्कारमूर्तींचा गौरव करण्यात आला.
मित्र परिवाराचे संयोजक संजय गजपुरे यांनी प्रास्ताविकातून स्नेहमिलन व सत्कार सोहळ्यामागील भूमिका स्पष्ट केली. मैत्रीच्या नात्यातून एकत्र आलेल्या मित्रांनी आपल्या सहकाऱ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करावा, त्यांच्या संघर्षाची दखल घ्यावी आणि मैत्रीचे ऋणानुबंध अधिक दृढ करावेत, या भावनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सत्कारमूर्तींच्या कार्याचा परिचयही करून दिला.
यावेळी अॅड. आशिष धर्मपुरीवार, सचिव, डॉ. हेडगेवार समिती, चंद्रपूर आणि डॉ. सतीश वारजूकर, भाजप नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी मित्र परिवाराच्या उपक्रमाचे अभिनंदन करत सत्कारमूर्तींसोबतच्या मैत्रीपूर्ण आठवणींना उजाळा दिला. प्रत्येकाच्या यशामागे कष्ट, संघर्ष, सातत्य आणि मित्रांचे सहकार्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
सत्काराला उत्तर देताना गणेश तर्वेकर यांनी मित्र परिवाराचे आभार मानले. आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास आणि दिलेली संधी यामुळेच ही जबाबदारी मिळाली असून, हे यश त्या विश्वासाचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी आपल्या मनोगतात मंचावर उपस्थित असलेल्या मित्र परिवारामुळेच आजचे यश मिळाल्याचे मत व्यक्त केले. मित्रांच्या प्रयत्नांमुळे आणि सहकार्यामुळे आपण या टप्प्यावर पोहोचल्याचे सांगताना त्यांनी मैत्रीसाठी कोणत्याही पदाचा त्याग करण्याची तयारी असल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थित मित्र परिवाराने उत्स्फूर्त दाद दिली.
यावेळी सत्कारमूर्तींसह अॅड. आशिष धर्मपुरीवार, डॉ. सतीश वारजूकर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी संचालक उपाध्यक्ष संजय डोंगरे, बँकेचे संचालक रोहित बोम्मावार, निशिकांत बोरकर, चिमूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष गीताताई लिंगायत, वडसा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौंदडकर मॅडम , प्रा. डॉ. अमीर धमानी सर, नगरसेवक सचिन आकुलवार, भाजप नेते राजू पाटील देवतळे, राजू पाटील झाडे, चिमुर न. प. उपाध्यक्ष संजय नवघडे, भाजप नेते मनीष तुमपल्लीवार , संतोष रडके, हेमंत लांजेवार, व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष गुलजार धमानी , तसेच मित्र परिवाराचे संयोजक संजय गजपुरे यांच्यासह मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मित्र परिवाराचे अजय काबरा, प्रवीण बंडावार, विनोद मेंढे, पवन नागरे, ओमप्रकाश मेश्राम, प्राचार्य देविदास चिलबुले, प्रा. लोमेश दुधे, प्रफुल लांबट, पंकज गरफडे, प्रशांत भुरे, नावीन्य बंडावार, विनोद गिरडकर, विजय बंडावार, सौ. प्रांजली बंडावार, सौ. विनया काबरा, सौ. सोनाली मेश्राम, सौ. सीमा मेंढे, सौ. किरण गजपूरे, सौ. प्रियाताई लांबट , सौ. जयश्री गरफडे आणि सौ. भावना तर्वेकर यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग भानारकर यांनी केले. अजय काबरा यांनी आभार मानले. वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!