जांबुळघाट आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे केस कापण्याचा आदेश कुणाचा?
५०० विद्यार्थ्यांच्या सन्मानाचा सवाल; पालकांचा प्रशासनाला जाब
चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत त्यांच्या सुरक्षिततेची, प्रतिष्ठेची आणि मानसिक आरोग्याची जबाबदारी असलेल्या जांभुळघाट शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे केस कापल्याच्या कथित प्रकाराने पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. इयत्ता पहिली ते अकरावीपर्यंत सुमारे ५७२ विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या आश्रमशाळेतील अंदाजे ५०० विद्यार्थ्यांचे केस कापल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे रात्री विद्यार्थी झोपेत असतानाही केस कापण्याचा प्रकार पहाटेपर्यंत सुरू असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांशी असा प्रकार करण्याचे निर्देश नेमके कुणी दिले, हा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारे ३ वाजता विद्यार्थ्यांचे केस कापल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर रात्री सुमारे ११ वाजता विद्यार्थ्यांच्या झोपेच्या वेळेत पुन्हा केस कापण्याचे काम सुरू झाल्याचा आरोप आहे. हे काम पहाटे सुमारे ४ वाजेपर्यंत सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती आहे.
या प्रकरणात आश्रमशाळेचे अधीक्षक पी. के. आत्राम यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. ते दारूच्या नशेत असतानाच केस कर्तन करणाऱ्यावर दबाव टाकून विद्यार्थ्यांचे केस कापण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, त्यातील सत्यता निष्पक्ष चौकशीतून स्पष्ट होणे आवश्यक आहे.
आधी अन्नाचा प्रश्न, आता विद्यार्थ्यांच्या सन्मानाचा -
याच आश्रमशाळेत यापूर्वी विद्यार्थ्यांना शिळ्या अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येते. त्या वेळी विविध सामाजिक संघटनांनी आवाज उठविला होता. आता पुन्हा विद्यार्थ्यांशी संबंधित गंभीर आरोप समोर आल्याने आश्रमशाळेतील व्यवस्थापन आणि देखरेख यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पालकांचा सवाल असा आहे की, विद्यार्थ्यांचे केस कापणे आवश्यक होते तर त्यासाठी पालकांना माहिती देण्यात आली होती का? विद्यार्थ्यांची संमती घेण्यात आली होती का? रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांचे केस कापण्याची गरज काय होती? आणि हा निर्णय घेतला असेल तर त्याची जबाबदारी कोणाची?
आश्रमशाळेतील विद्यार्थी हे बहुतांश वेळा आपल्या पालकांपासून दूर राहतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनावर अधिक असते. विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण करणारा कोणताही प्रकार घडला असल्यास तो किरकोळ बाब म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वतंत्रपणे जबाब नोंदवावेत. पालकांशी संवाद साधावा, संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि रात्री विद्यार्थ्यांचे केस कापण्यात आले असल्यास त्यामागील आदेश व जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.
आरोप खरे असल्यास जबाबदारांवर कारवाई कधी ?
हा पालकांचा प्रशासनाला थेट सवाल आहे. चौकशीपूर्वी कोणालाही दोषी ठरवणे योग्य नाही; मात्र ५७२ विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित प्रकरणाची पारदर्शक चौकशी न करणेही तितकेच गंभीर ठरेल. विद्यार्थ्यांचा सन्मान, सुरक्षितता आणि पालकांचा प्रशासनावरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आता आदिवासी विकास विभाग नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!