१४ वर्षांची चिरनिद्रा — उर्मिला

“रामायण… प्रश्नांच्या आरशातून”
ग्रंथरचनेत हरवलेली काही पात्रं…

भाग 1

१४ वर्षांची चिरनिद्रा — उर्मिला



अयोध्येच्या वैभवशाली राजवाड्यांइतकीच समृद्ध होती मिथिलेची भूमी…
राजा जनकांची कन्या — सीता सर्वांना परिचित होती…
पण तिच्याच सावलीत, तितकीच तेजस्वी… पण शांत स्वभावाची एक कन्या होती — उर्मिला.

उर्मिला…
राजा जनकांची धाकटी मुलगी…
सीतेची बहीण…
आणि स्वभावाने अगदी वेगळी…

जिथे सीता धैर्य आणि कर्तव्याची प्रतिमा होती,
तिथे उर्मिला होती — समजूतदारपणा, संयम आणि शांततेची मूर्ती.

जनकांच्या राजवाड्यात वाढताना तिने केवळ राजघराण्याचे संस्कारच नाही…
तर कर्तव्य, त्याग आणि समजूतदारपणा हे गुणही आत्मसात केले होते.

सीतेच्या स्वयंवराच्या दिवशी…
रामाने शिवधनुष्य उचललं…
आणि त्या घटनेने केवळ सीतेचं नव्हे…
तर उर्मिलाचं आयुष्यही बदलून टाकलं.

त्या एका क्षणात —
सीतेला राम मिळाले…
आणि उर्मिलेला — लक्ष्मण…

पण हा निर्णय तिचा होता का…?
की परिस्थितीने तिच्यासाठी ठरवलेला…?

तीने प्रश्न विचारले नाहीत…
ना विरोध केला…
कारण त्या काळात —
राजघराण्यातील कन्यांचे निर्णय बहुतेक वेळा
त्यांच्या हातात नसतच…

कदाचित…
तिथेच उर्मिलाच्या आयुष्यातील पहिला “निःशब्द त्याग” सुरू झाला होता…

लक्ष्मण…
रामाचा अनुज…
धैर्यवान, कर्तव्यनिष्ठ… आणि रामावर अपार प्रेम करणारा.

उर्मिलाचा विवाह लक्ष्मणाशी झाला…
आणि ती अयोध्येत आली —
एक नवीन संसार, नवीन नात्यांसोबत…

सुरुवातीचे काही दिवस…
कदाचित स्वप्नासारखेच होते…

पण नियतीने तिच्यासाठी वेगळंच काही ठरवलं होतं.

अचानक…
राजदरबारात घडलेल्या एका निर्णयाने सगळं बदलून टाकलं —
रामांना १४ वर्षांचा वनवास.

सीतेने रामांसोबत जाण्याचा निर्णय घेतला…
आणि लक्ष्मणानेही क्षणाचाही विलंब न करता
रामांच्या सेवेसाठी सोबत जाण्याचं ठरवलं.

ही बातमी उर्मिलासमोर आली तेव्हा…

तीने आक्रोश केला नाही…
ना विरोध केला…

कारण ती लक्ष्मणाला ओळखत होती.

त्याच्यासाठी राम म्हणजे केवळ भाऊ नव्हते…
तर कर्तव्य होते… जीवन होते.

उर्मिलाने त्याला थांबवलं असतं…
तर कदाचित तो थांबला असता…

पण मग तो लक्ष्मण राहिला असता का…?

ही जाणीव तिला होती.

म्हणूनच —
तीने त्याच्या निर्णयाला विरोध नाही…
तर निःशब्द समर्थन दिलं.

त्या एका क्षणात —
तीने स्वतःचा संसार बाजूला ठेवला…
आणि त्याच्या कर्तव्याला प्राधान्य दिलं.

लक्ष्मण वनवासाला निघून गेला…

आणि उर्मिला…
राजवाड्यात राहिली.

पण ते राहणं…
फक्त शरीराने होतं.

मनाने…
ती जणू कुठेतरी दूर निघून गेली होती.

१४ वर्ष…

ना पतीचा सहवास…
ना कुठली अपेक्षा…
ना कुठली तक्रार…

*तीने ही १४ वर्ष कशी घालवलीत…?*

इतिहासात याचं ठोस उत्तर नाही…
पण काही कथांनुसार —
लक्ष्मणाने वनवासात जागरण केलं,
म्हणून उर्मिलाने त्या १४ वर्षांत झोपेचं व्रत स्वीकारलं…

तर काही ठिकाणी —
तीने संपूर्ण आयुष्य संयमाने, एकटेपणात व्यतीत केलं असं सांगितलं जातं…

कथा काहीही असो…

सत्य इतकंच —
ती १४ वर्षं…
स्वतःला विसरून जगली.

आणि म्हणूनच कदाचित —
तिच्या आयुष्याला एक नाव दिलं गेलं…

“चिरनिद्रा…”

पण खरंच…
ही चिरनिद्रा म्हणजे नेमकं काय…?

चीर + निद्रा…
म्हणजे दीर्घकाळाची झोप…

एक अशी अवस्था —
जिथे शरीर जिवंत असतं…
पण प्राण… कुठेतरी हरवलेले असतात…

लक्ष्मण जेव्हा उर्मिलेला सोडून गेला…
त्या क्षणी —
उर्मिलेच्या संसाररूपी देहातून जणू प्राणच निघून गेला…

ती जगत होती…
पण तिचं जगणं…
जणू एका शांत चिरनिद्रेत बुडालं होतं…

ती असहाय नव्हती…
पण परिस्थितीसमोर तिचं ‘स्व’ नक्कीच मागे पडलं होतं…

ना आवाज…
ना अपेक्षा…
ना स्वतःसाठी काही उरलेलं…

फक्त —
कर्तव्याला दिलेलं एक निःशब्द समर्थन…

पण प्रश्न असा आहे…

रामायणात आपण रामाचा त्याग पाहतो…
सीतेचा त्याग मानतो…
लक्ष्मणाच्या सेवेला गौरवतो…

पण उर्मिलाचं काय…?

तिचा त्याग कमी होता का…?

की फक्त —
तो शांत होता… म्हणून दुर्लक्षित राहिला…?

कधी विचार केलात का…
की १४ वर्षं वनवास करणं कठीण होतं…
की १४ वर्षं शांतपणे सगळं सहन करणं…?

कदाचित…

काही कथा अशा असतात —
ज्या मोठ्याने सांगितल्या जात नाहीत…

त्या फक्त…
शांतपणे जगल्या जातात…

आणि उर्मिला…
त्याच शांत कथांपैकी एक आहे…

-----------------------
“ती बोलली नाही…
म्हणून तिची कथा कुणी ऐकलीच नाही…
— उर्मिला”

“तुम्हाला काय वाटतं — उर्मिला असहाय होती, की तीच सर्वात मजबूत होती?”

तृष्णा (रानू)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!