स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत ६३ कर्मचाऱ्यांची तपासणी
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत वरोरा नगरपरिषद आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात ६३ स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
शिबिराचे उद्घाटन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. “कर्मचारी हे नगरपरिषदेचा कणा आहेत. विशेषतः स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे,” असे त्यांनी सांगितले.
उपजिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने सहभागी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर (शुगर) यांसह विविध प्राथमिक तपासण्या मोफत करण्यात आल्या. तपासणीदरम्यान आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सल्लाही देण्यात आला.
कामाच्या ठिकाणी घ्यावयाची काळजी, योग्य आहार, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्यविषयक सवयी याबाबत डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. नियमित आरोग्य तपासणी व आजारांची प्राथमिक लक्षणे वेळीच ओळखण्याचे महत्त्वही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य तपासणीसोबतच कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हे शिबिर उपयुक्त ठरले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!