बाईकला स्कुटीची धडक; स्कुटीतून निघाले दारूच्या पेट्या

गांधी चौकात अपघातानंतर स्कुटीच्या डिक्कीत दारूचे बॉक्स; चालक पोलिसांच्या ताब्यात



मूल : गांधी चौक परिसरात आज सायंकाळी सेवन हिल्स बारच्या दिशेने येणाऱ्या एका स्कुटीने बाईकला धडक दिल्याची घटना घडली. अपघातानंतर स्कुटीची डिकी उघडली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दारूचे बॉक्स आढळून आल्याने घटनास्थळी काही काळ खळबळ उडाली.

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्कुटी चालकाला वाहनासह ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. स्कुटीच्या डिक्कीत दारूचे बॉक्स आढळल्याने ही दारू नेमकी कुठे आणि कोणत्या उद्देशाने नेली जात होती, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे समजते.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सदर दारू अवैध विक्रीसाठी नेली जात असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे पोलिसांकडून पुष्टी झालेली नाही.

दरम्यान, अपघाताच्या वेळी मोठा अनर्थ टळला. गर्दीच्या गांधी चौक परिसरात बाईकला धडक झाल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. पोलिसांनी स्कुटी आणि चालकाला ताब्यात घेतल्याने या प्रकरणातील दारूचा स्रोत, वाहतुकीचा उद्देश आणि संबंधित व्यक्तींची भूमिका तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!